Biporjoy: पाकिस्तानात बिपरजॉय वादळाचे तुफान वार्तांकन; पत्रकाराने बातमीसाठी चक्क पाण्यात मारली उडी, पाहा मजेदार व्हिडीओ
भारतासह पाकिस्तान देखील बिपरजॉय चक्रीवादळामुळे अलर्टवर आहे, अनेक भागांतील लोक घरात आहेत आणि त्यांना घराबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा एक व्हिडिओ लोकांना हसवत आहे.
Pakistan: पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाबने ईदनिमित्त केलेले वार्तांकन आजही संस्मरणीय आहे. आता संपूर्ण देश चक्रीवादळ बिपरजॉयच्या संदर्भात हाय अलर्टवर असताना, आणखी एक चांद नवाबसारख्या पत्रकाराचं वार्तांकन (Reporting) लोकांना हसवत आहे. ट्विटरवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय, यामध्ये अब्दुर रहमान असे नाव सांगणारा पत्रकार वार्तांकन करत आहे. वादळाचे वार्तांकन करण्याची त्याची स्टाईल लोकांना खूपच मजेदार वाटत आहे. देशातील चक्रीवादळ बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सिंधसारख्या प्रांतात वादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.
वार्तांकनासाठी पत्रकाराने मारली पाण्यात उडी
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिपोर्टर बोलतोय ‘आजही समुद्र इतका खोल आहे की बोट कशी किनाऱ्यावर आणली गेली हे कॅमेरामन दाखवेल. तर, मी पाण्यात उडी मारून तुम्हाला दाखवेन की पाणी किती खोल आहे आणि किती खोलवर जावे लागते’. यानंतर तो थेट पाण्यात उडी मारतो आणि तो उडी मारताच आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांचे हास्य व्हिडीओमध्ये ऐकू येते. यानंतर तो बोटीच्या जवळ जातो आणि सांगतो की पाणी खूप खोल आहे. रिपोर्टर अब्दुर रहमानचा हा व्हिडिओ व्यंगचित्र समजला जात आहे. व्हिडीओमध्ये पुढे तो म्हणतो की, पाणी इतके खोल गेले आहे की त्याच्यापुढे सर्व मुद्दे फेल झाले आहेत. पत्रकाराच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे आणि अनेक लोकांनी तो रिट्विट केला आहे.
In the meanwhile: #CycloneBiporjoy reporting from Pakistan pic.twitter.com/9NylcHtkmX
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) June 14, 2023
170 किमी वेगाने वारे
बिपरजॉय चक्रीवादळाच्या संदर्भात पाकिस्तानमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे, पाकिस्तानात हे वादळ अत्यंत धोकादायक बनत आहे. तसेच, सिंध प्रांतातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सिंध प्रांतातील विविध भागांव्यतिरिक्त थट्टा, सुजावल आणि बदीनमधील हजारो लोक चक्रीवादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आधीच आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत.
दरम्यान, धुळीचे वादळाने पाकिस्तानातील हलक्या ते मुसळधार पावसासह संवेदनशील भागांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी श्रेणी-3 चक्रीवादळ कराची (पाकिस्तान) आणि मांडवी (भारत) येथे येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात 140 ते 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, जे 170 किमी प्रतितास वेगापर्यंत जाऊ शकतात.
लोकांचं स्थलांतर सुरू
बिपरजॉयचा प्रभाव थट्टाच्या केटी बंदर आणि भारतातील गुजरातच्या किनारपट्टी भागात असू शकते. हवामान तज्ञांच्या मते, थट्टा, बदीन, सुजावल, कराची, मीरपूरखास, उमरकोट, हैदराबाद, ओरमारा, तांडो अल्लाहयार आणि तांडो मोहम्मद खान या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. अधिकाऱ्यांनी किनारी भागात पाकिस्तानी लष्कर, रेंजर्स, जिल्हा प्रशासन तैनात करण्यास सुरुवात केली आहे. सिंधच्या किनारी भागात राहणाऱ्या हजारो लोकांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
हेही वाचा: