Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ, दंड देखील आकारणार
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. आता भारताच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली नाही. अमेरिकेकडून भारतातील कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार शुल्क आणि दंड द्यावा लागेल, असं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
भारत आमचा मित्र आहे. कित्येक वर्षांपासून आमची मैत्री असली तरी आमचा भारतासोबत व्यापार कमी आहे. कारण त्यांचं टॅरिफ खूप अधिक आहे. जगातील सर्वाधिक टॅरिफ त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठीण आणि घृणास्पद गैर-मौद्रिक व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाकडून युक्रेनमध्ये होणाऱ्या हत्या थांबवाव्या असे वाटते - सर्व काही चांगले नाही! म्हणून भारताला 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ आणि वरील दंड देईल. याकडे तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद MAGA.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा करताना ट्रथ सोशलवर दोन पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबरची व्यापार तूट मोठी असल्याचं म्हटलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेला भारताकडून कसा प्रतिसाद दिला जातोय ते पाहावं लागेल.
भारतावर टॅरिफ लादताना रशियाचा उल्लेख
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान देश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला ट्रम्प यांनी मुदतवाढ 1 ऑगस्टपर्यंत दिली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती होत नव्हती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवरुन भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारतावर टॅरिफ लादताना ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीला देखील जबाबदार धरलं आहे. भारतानं लष्करी शस्त्र रशियाकडून खरेदी केलेली आहेत. याशिवाय भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल रशियाकडून खरेदी करतो. चीननंतर भारत रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करणारा दुसरा मोठा देश आहे. रशियाच्या यूक्रेनवरील कारवाईचा आधार घेत ट्रम्प भारतावर टॅरिफ आणि दंड लादण्याचा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट
























