यूएस कॅपिटॉल हल्ल्यासंबंधी कागदपत्रे प्रकाशित करु नयेत; डोनाल्ड ट्रम्प यांची न्यायालयात याचिका
यूएस कॅपिटॉलवर (US Capitol) झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीला व्हाईट हाऊसमधील कोणतीही कागदपत्रं देण्यात येऊ नये असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
वॉशिग्टन : यूएस कॅपिटॉलवर (US Capitol) झालेल्या हिंसक हल्ल्यासंबंधी व्हाईट हाऊसमधील कोणतेही कागदपत्रे चौकशी समितीला देण्यात येऊ नयेत, त्याचे प्रकाशन करण्यात येऊ नये अशा आशयाची एक याचिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी न्यायालयात दाखल केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि यूएस नॅशनल अर्काइव्ह्ज यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे. ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील रेकॉर्ड्स रिप्रेझेन्टेटिव्ह सिलेक्ट कमिटीसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे.
बायडेन प्रशासनाने हाऊस कमिटीसाठी खुली केलेली कागदपत्रे ही कॅपिटॉल हिंसाचाराशी संबंधित नाहीत, तसा जर कोणी अर्थ लावत असेल तर तो चुकीचा आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. देशातील इतर महत्वाच्या गोष्टी आणि आपले अपयश लपवण्यासाठी ज्यो बायडेन या गोष्टी करत आहेत असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत पराभव समोर दिसत असताना 6 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटॉलवर हल्ला केला. स्टॉप द स्टील या नावाने काढण्यात आलेल्या रॅलीनंतर हा हिंसक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या हिंसाचारामुळे जागतिक महासत्ता आणि सर्वात जुनी लोकशाही असं बिरुद मिरवणाऱ्या अमेरिकेची मोठी नाचक्की झाली होती. आपला पराभव समोर दिसत असताना डोनाल्ज ट्रम्प यांनी समर्थकांना हिंसेसाठी प्रवृत्त केलं असा आरोप त्यांच्यावर बायडेन प्रशासनाने ठेवला होता.
यूएस कॅपिटॉल हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी बायडेन प्रशासनाने रिप्रेझेन्टेटिव्ह सिलेक्ट कमिटी स्थापन केली. या समितीला ट्रम्प यांच्या कारकीर्दीतील कागदपत्रे अभ्यासासाठी खुली करण्यात आली. यालाच आता ट्रम्प यांनी आक्षेप घेतला असून यूएस कॅपिटॉल हिंसाचाराशी या कागदपत्रांचा काही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- धक्कादायक! US Capitol मधील अभुतपूर्व गोंधळावर जागतिक राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी
- US Capitol | अमेरिकेतील गोंधळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले...
- US Capitol Violence | अमेरिकेसाठी हा अतिशय लज्जास्पद क्षण; बराक ओबामांची तीव्र नाराजी