(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Long March : जगाच्या राजकारणावर परिणाम करणारा 'हा' लाँग मार्च ठावूक आहे का?
Long March : लाँग मार्च हा शब्द सध्या शेतकरी-आदिवासींच्या आंदोलनामुळे अधिक चर्चिला जात आहे. मात्र, जगाच्या राजकारणाला कलाटणी देणारा एक लाँग मार्च जवळपास 90 वर्षांपूर्वी झाला होता.
Long March : सध्या राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने (All India Kisan Sabha) शेतकरी, आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी लाँग मार्च (Long March) काढण्यात आला आहे. या लाँग मार्चमुळे शेतकरी, आदिवासींचे प्रश्न किती सुटतील, हे येणारा काळ सांगेल. मात्र, एका लाँग मार्चमुळे संपूर्ण जगाच्या राजकारणावर (World Politics) परिणाम झाला. हा लाँग मार्च चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (Chinese Communist Party) नेतृत्वातील होता. चीनमधील राष्ट्रवादी विचारांच्या सरकारसोबत दोन हात करताना कम्युनिस्ट पक्ष वाचवण्यासाठी, नंतर विस्तार करण्यात या लाँग मार्चने मोठी भूमिका बजावली. चीनमधील या लाँग मार्चमुळे पुढे कम्युनिस्ट अधिक मजूबत झाला.
चीनमधील परिस्थिती
कधी काळी चीन हा आशियातील सर्वात प्रभावी आणि संपन्न देश होता. इसवी सन 618 मध्ये थांग राजघराण्याची सत्ता होती. त्यांच्या काळात चीन हा संपन्न, समृद्धी असलेला देश झाला होता. चीनमध्ये छिंग हे राजघराणे शेवटचे ठरले. त्यांच्या काळात चीनची अधोगती सुरु झाली. 1840 मध्ये ब्रिटीशांसह इतर साम्राज्यवादी युरोपीयन देश, अमेरिका, जपान आदी देशांनी चीनमधील विविध भागात आपली प्रभाव क्षेत्रे तयार केली. मात्र, चीन हा पूर्णपणे वसाहतवादी देश झाला नाही. भारतासारखा पूर्णपणे तो पारतंत्रात नव्हता. त्यावेळी चीनच्या सत्तेवर पकड मिळवलेले मांचू राजघराण्याविरोधात लोकांमध्ये रोष होता.
क्रांतिकारक नेते सन-यत्-सेन यांनी या राजवटीविरोधात तरुणांना, लोकांना एकत्र करण्यास सुरुवात केली. चीनमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाला पाहिजे, असे मानणारा एक गट तयार झाला होता. या गटावर पाश्चात्य विचारांचा पगडा तयार झाला होता. त्यानंतर रशियातील साम्यवादी विचार, कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव या गटावर निर्माण झाला. पुढे 1911 मध्ये चीनमध्ये क्रांती झाली.
सन-यत्-सेन यांच्या नेतृत्वातील क्रांतीकारी गटाकडे चीनचा बराचसा भाग आला होता. मांचू सत्तेकडून उठाव दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. पुढे त्यांना सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. सन-यत्-सेन यांच्या नेतृत्वातील आघाडीमध्ये कुमिंगतांग आणि कम्युनिस्ट विचारांचे गट एकत्र होते. 1925 मध्ये सेन यांच्या निधनानंतर कुमिंगतांग आणि कम्युनिस्टांमध्ये खटके उडू लागले. अखेर कम्युनिस्ट पक्ष बाहेर पडला. 1921 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती. माओच्या नेतृत्वातील पक्षाने शेतकरी आणि कामगारांचे लढे उभारले. त्यांच्या अधिकारासाठी चळवळी केल्या. जमीनदारी व्यवस्थेला आव्हान देण्यात आले. 1925 मध्ये माओ यांनी हुनान प्रांतात जहाल शेतकरी आंदोलन चालवले. या आंदोलनाच्या परिणामी जमिनदारी, सरंजामी व्यवस्था उलथवून टाकली.
सेन यांच्या मृत्युनंतर चांग काई शेक हा कुमिंगतांग पक्षाचा प्रमुख झाला. जमीनदार, व्यावसायिक, उद्योगजक वर्गाला तो झुकतं माप देत असे. त्याने कुमिंगतांग पक्षाचे शुद्धीकरण अभियान सुरु केले आणि कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांना पक्षातून काढले. या शुद्धीकरण आंदोलनात हजारो कामगार, शेतकरी, कम्युनिस्ट कार्यकर्ते, नेते ठार झाले.
लाँग मार्चची सुरुवात
माओच्या नेतृत्वातील कम्युनिस्ट पक्षाने शेतकऱ्यांमध्ये आपली पकड अधिक घट्ट केली. कियांग्सी प्रांत हा कम्युनिस्टांचा गड आणि प्रमुख केंद्र झाले. चांग काई शेकच्या नेतृत्वातील नानकिंगच्या सरकारने आपली पकड मजबूत करण्यासाठी कम्युनिस्टांविरोधात मोठी मोहीम राबवली. कियांग्सी प्रांतातील कम्युनिस्ट सरकारविरोधात मोठी दडपशाही सुरु केली. 1934 मध्ये कम्युनिस्टांविरोधात मोहीम सुरु केली. यामध्ये हजारोंच्या संख्येत कम्युनिस्ट ठार करण्यात आले. या दडपशाहीतून वाचण्यासाठी कम्युनिस्टांनी उत्तरेकडील शेनसी प्रांताच्या दिशेने "लाँग मार्च" सुरु केला.
हा लाँग मार्च 16 ऑक्टोबर 1934 रोजी सुरु झाला आणि 20 ऑक्टोबर 1935 पर्यंत सुरु होता. हा लाँग मार्च माओ त्से तुंग आणि चाऊ एनलाय यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. यामध्ये लाल फौजांनी पश्चिम चीनच्या दुर्गम भागातून मार्गक्रमणा करत पहिल्यांदा पश्चिम दिशेकडे आणि पु्न्हा तेथून उत्तरेकडे वळून शान्शी प्रांतात दाखल झाले. हा लाँग मार्च अतिशय धोकादायक होता. कम्युनिस्ट सैन्य 18 पर्वत रांगा आणि 24 नद्या पार करुन शांक्सीच्या वायव्य प्रांतात पोहोचले. हा लाँग मार्च सुरु झाला तेव्हा जवळपास 86 हजार सैन्य, प्रशासकीय अधिकारी होते. या लाँग मार्च दरम्यान, ठिकठिकाणी लोक जोडली जात होती. लाँग मार्च सुरु असताना कुमिंगतांग सैन्याने कम्युनिस्टांच्या लाल सैन्यावर हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. लाँग मार्च संपला तेव्हा फक्त 8 ते 10 हजार जण उरले होते. या लाँग मार्चमुळे कम्युनिस्ट पक्षाकडे अनेकजण आकर्षित झाले होते. त्याच्या परिणामी कम्युनिस्ट पक्षाचा जनाधार आणखी काही प्रमाणात वाढला. चीनच्या इतिहासात हा लाँग मार्च महत्त्वाचा टप्पा समजला जातो. प्रतिकूल परिस्थितीत हा लाँग मार्च काढण्यात आला होता.
जपान युद्ध आणि क्रांती
1937 मध्ये चीनवर जपानने हल्ला केला. जपानने चीनवर हल्ला केला होता त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाने कुमिंगतांग पक्षाला एकत्रितपणे जपानच्या आक्रमणाचा मुकाबला करण्याचे आवाहन केले. त्यावेळी कम्युनिस्ट आणि कुमिंगतांग पक्षाचे सैन्य एकत्र आले आणि जपानचा पराभव केला. जपान पराभूत झाल्यानंतर चीनमध्ये गृहयुद्ध सुरु झाले. या दरम्यानच्या काळात चिनी कम्युनिस्ट पक्षाची चिनी नागरिकांमध्ये लोकप्रियता वाढली होती. कम्युनिस्ट पक्षाने शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबवले होते. तर, कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण केले. त्यामुळे माओच्या नेतृत्वात पुढे 1949 मध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. त्याचे परिणाम संपूर्ण जगाच्या राजकारणावर होत आहेत.