(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Vaccine | आनंदाची बातमी... वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस तयार होण्याची शक्यता : WHO
संपूर्ण जग कोरोनावरील प्रभावी वॅक्सिनची वाट पाहत आहे. अशातच डब्ल्यूएचओने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे सध्या लोकं कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. जगभरातील अनेक देशांतील संशोधकही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच, डब्ल्यूएचओने जारी केलेल्या एका वक्तव्यामुळे आशेचा किरण दिसत आहे. या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्यीची शक्यता असल्याचं WHO च्या वतीने सांगण्यात आलं आहे.
डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, आम्हाला आशा आहे की, ज्या वॅक्सिनची वाट संपूर्ण जग पाहत आहे, ते वॅक्सिन या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार आहे. तसेच त्यांनी दावा न करता अशी आशा असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, डब्लूएचओच्या नेतृत्त्वात येणारी COVAX ग्लोबल वॅक्सीनच्या जवळपास 9 प्रकारच्या वॅक्सिनवर काम सुरु आहे. ज्या चाचण्यांमधून त्यांचे परिणाम चांगले दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच वॅक्सिनचे परिणाम असेच येत राहिले तर यावर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल अशी आशा डब्लूएचओने व्यक्त केली आहे.
मॉर्डना वॅक्सिन वृद्धांसाठी सुरक्षित असल्याचं निष्पन्न; भारतीय लसीबाबतचे अपडेट्स
जगभरात 3 कोटी 60 लाख लोकांना लागण
जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने अनेकांना आपल्या विळख्यात अडकवलं आहे. जगभरात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 10 लाख 53 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच 2 कोटी 71 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. संपूर्ण जगभरात 78 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भारत जगभरातील सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्या असणाऱ्या देशांपैकी एक आहे. तसेच कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृतांच्या संख्येतही भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचसोबत भारत असा दुसरा देश आहे, जिथे सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत.