China Astronauts Return : अंतराळवीरांचं पृथ्वीवर 'कमबॅक', सहा महिन्यानंतर जमिनीवर परतले; कसे होते अवकाशातील 'ते' दिवस?
China Astronauts Return : सहा महिन्यानंतर अंतराळातून तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. हजारो किलोमीटर दूर त्याचं जीवन कसं होतं जाणून घ्या
China Astronauts Return : सहा महिन्यांनंतर तीन अंतराळवीर (Astronauts) सुखरुप पृथ्वीवर (Earth) परतले आहेत. हे तिन्ही अंतराळवीर चीनचे आहेत. चीनने एका मोहिमे अंतर्गत तीन मानवांना अंतराळात पाठवलं होतं. हे अंतराळवीर आता मोहिम संपल्यानंतर सुखरुप जमिनीवर परतले आहेत. पृथ्वीच्या बाहेर जाऊन सहा महिने अंतराळात राहिलेले या तिघांचा तिथला अनुभव कसा होता ते जाणून घेऊया?
तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतले
चिनी स्पेस स्टेशनने (Chinese Space Station) दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 3 अंतराळवीर रविवारी, 4 जून रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. फेई जुनलाँग, डेंग किंगमिंग आणि झांग लू अशी या अंतराळवीरांची नावे आहेत. हे तिन्ही अंतराळवीर चीनच्या शेन्झोउ-15 यानातून पृथ्वीवर उतरले. हे अंतराळयान गेल्या सहा महिन्यांपासून अंतराळात होते. हे यान आणि अंतराळवीर हजारो किमी दूर ते चिनी स्पेस स्टेशन तयार करण्याच्या मोहिमेवर काम करत होते.
चीनची आणखी एक अंतराळ मोहीम फत्ते
चीनच्या अंतराळ संस्थेने अधिक माहिती देत सांगितलं आहे की, फेई जुनलाँग, डेंग किंगमिंग आणि झांग लू 4 जून रोजी सकाळी 6:33 वाजता उत्तर चीनमधील डोंगफेंग लँडिंग साइटवर सुरक्षितपणे उतरले. अंतराळवीर झांग यांनी म्हटलं की, "माझ्या देशात परतताना मला खूप आनंद होत आहे. आता आम्हांला पृथ्वीनुसार आपल्या शरीराची रचना करायची आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल." अंतराळवीरांनी सांगितले की ते पुन्हा प्रशिक्षण घेऊन भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी सज्ज होतील.
अंतराळवीरांनी सांगितला अनुभव
पृथ्वीवर परतलेल्या चिनी अंतराळवीरांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. अंतराळवीरांनी सांगितलं की, ते त्यांच्या अंतराळ स्थानकाच्या खिडकीतून त्यांचा देश पाहायचे. अंतराळवीर झांग यांनी सांगितलं, "कोणत्याही वस्तूचं वजन जाणवत नाही. अंतराळात खाणं, पिणं आणि झोपणं हे सर्व सेफ्टी शूटच्या कक्षेत होतं. आपल्यासोबत नेहमी ऑक्सिजन सिलेंडर जोडलेलं असतं."
'शेन्झोऊ-15' मानवयुक्त अंतराळ मोहीम यशस्वी
चीनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जुनलाँग, किंगमिंग आणि लू यांनी सहा महिन्यांची अंतराळ स्थानक मोहीम पूर्ण केली आहे. एजन्सीने जाहीर केले की, अंतराळवीरांची प्रकृती ठीक आहे. 'शेन्झोऊ-15' मानवयुक्त अंतराळ मोहीम यशस्वी झाली. यापूर्वी, 30 मे रोजी एका नागरिकासह तीन अंतराळवीरांना जुनलाँग, किंगमिंग आणि लू यांना चीनी अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलं होतं. अंतराळवीरांची ही नवी टीम पाच महिने अंतराळ स्थानकात राहणार आहे.
चीन बनवतंय स्वतःचं स्पेस स्टेशन
चीन अंतराळात स्वतःचं स्पेस स्टेशन बनवत आहे. याचं काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी चीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवत आहे. 2021 मध्ये स्पेस स्टेशन बांधणीला सुरुवात झाली आहे. चीनने अंतराळात बनवलेल्या चीनच्या स्पेस स्टेशनची खासियत म्हणजे त्यात दोन रोबोटिक हात आहेत. हे रोबोटिक हात एकाच वेळी उपग्रहांसह अनेक पकडू शकतात, असा चीनचा दावा आहे.