UK General Election Results : ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉनसन पुन्हा पंतप्रधानपदी
ब्रेक्झिटबद्दलच्या अनिश्चितता संपण्याच्या मार्गावर आहेत. ब्रिटनमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ब्रेक्झिटचे समर्थन करणारे पंतप्रधान बोरीस जॉनसन बहुमतासह विजय झाले आहेत.
लंडन : ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटचे समर्थन करणारे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांना सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवण्यात यश आले आहे. या विजयामुळे ब्रेक्झिटबद्दलच्या अनिश्चितता संपतील. त्यामुळे ब्रिटनला युरोपीयन संघापासून वेगळे करण्याचा मार्ग सोपा होईल, असे बोलले जात आहे.
नुकत्याच हाती आलेल्या कलानुसार ब्रिटनच्या संसदेत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने बहुमताचा आकडा (326) पार केला आहे. कंझर्व्हेटिव्हला 363 तर जागा मिळाल्या आहेत. ब्रिटनमधला सध्याचा विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीला 203 जागा मिळवता आल्या आहेत.
ब्रिटनच्या जनतेने कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत दिल्यामुळे पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बोरिस जॉनसन पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. त्यामुळे ब्रिटन पुढील महिन्यात युरोपियन युनियनमधून बाहेर पडेल. जॉनसन म्हणाले की, ही ऐतिहासिक निवडणूक ठरली आहे. ब्रिटनच्या जनतेवर ही निवडणूक लादली गेली आहे. परंतु तशी आमची बिलकूल इच्छा नव्हती. परंतु ही निवडणूक घेणं भाग पडलं. जनतेनेही भरभरुन मतदान केले. आम्हाला बहुमत देऊन ब्रेक्झिटचे संकेत दिले आहे.
आम्हाला ब्रेक्झिटचा जनादेश : जॉनसन बोरीस जॉनसन म्हणाले की, आम्हाला ब्रिटनच्या जनतेने ब्रेक्झिटचा जनादेश दिला आहे. जनतेने ब्रिटनला युरोपीय संघापासून वेगळे करण्याचा कौल देत आम्हाला बहुमत दिलं आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही गेट ब्रेक्झिटची घोषणा दिली होती. ती आता पूर्ण होणार आहे.
लेबर पार्टीसाठी काळरात्र : कॉर्बिन दरम्यान, लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. पराभवाबद्दल बोलताना कॉर्बिन म्हणाले की, ही लेबर पक्षासाठी काळरात्र आहे.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन बोरीस जॉनसन यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन जॉनसन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी पुन्हा एकदा बहुमताने विजय मिळवला आहे. त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. भारत-युके मधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी आपण एकत्र काम करु, अशी मी आशा करतो.
Many congratulations to PM @BorisJohnson for his return with a thumping majority. I wish him the best and look forward to working together for closer India-UK ties. pic.twitter.com/D95Z7XXRml
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2019