(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Imran Khan Shot at Rally : 'मला इम्रान खान यांना मारायचं होतं', अटक केलेल्या हल्लेखोराचा खुलासा
Imran Khan : इम्रान खान यांच्यावर भर रॅलीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने खुलासा करत म्हटलं आहे की, 'मला इम्रान खान यांना मारायचं होतं. मी लाहोर येथून निघालो तेव्हाच मी हे ठरवलं होतं.'
Deadly Attack on Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) यांच्यावर भर रॅलीत जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुरुवारी ( 3 नोव्हेंबर 2022 ) इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये इम्रान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इम्रान खान यांच्यावर भर रॅलीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने खुलासा करत म्हटलं आहे की, 'मला इम्रान खान यांना मारायचं होतं. मी लाहोर येथून निघालो तेव्हाच मी हे ठरवलं होतं.' मीडिया रिपोर्टनुसार हल्लेखोराने पुढे म्हटलं की, 'इम्रान खान लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत म्हणून मला फक्त आणि फक्त इम्रान यांना मारायचं होतं. माझ्या मागे इतर कुणाचाही हात नाही. मी एकटा इम्रान यांना मारण्यासाठी आलो होतो.'
इम्रान खान यांच्यावर भर रॅलीत गोळीबार
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे ( PTI ) इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा त्यांची रॅली हा गुजरांवाला येथील अल्ला हु चौकाजवळ होती. दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. यामध्ये एक हल्लेखोर ठार झाला असून एकाला पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पीटीआय कॅम्पजवळ एक व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये गोळीबार झाल्यानंतर इम्रान खान यांना समर्थकांनी घेरल्याचं पाहायला मिळत आहे.
हल्ल्यानंतर इम्रान खान यांची प्रतिक्रिया
पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान यांच्या दोन्ही पायांना गोळी लागली आहे. त्यांना लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'अल्लाहमुळे मी वाचलो, अल्लाहने मला नवीन जीवन दिलं आहे.' या घटनेनंतर पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री परवेझ इलाही लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, इम्रान खान यांनी परवेझ इलाही यांच्या भेटीदरम्यान सांगितलं की, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
इम्रान खान यांच्या अंगरक्षकांवरही संशय
दरम्यान, इम्रान खान यांच्या अंगरक्षकावरही संशय असल्याने त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते आलमगीर खान यांनी ट्विट करत इम्रान खान यांच्या अंगरक्षकाचा बचाव करण्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सरकार सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहे.
जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वजीराबादमध्ये मोर्चादरम्यान पीटीआय प्रमुख इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत. मुअज्जम नवाज असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी संशयिताला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं. पंजाबचे महानिरीक्षक फैसल शाहकर यांनी इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याबाबत गुजरातच्या प्रादेशिक पोलिस अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला आहे. तसेच, या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 15 ते 16 असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.