Imran Khan : पाकिस्तान हादरलं! माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, रॅली सुरू असताना हत्येचा प्रयत्न
Pakistan : इम्रान खान यांची रॅली सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत.इम्रान खान यांच्यासोबतच्या एका सहकाऱ्याचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan Ex Prime Minister Imran Khan) यांच्यावर गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीच्या वातावरणातून जात आहे.
या आधी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनिझिर भुट्टो यांच्यावर गोळीबार करण्यात आली होती. त्यामध्ये बेनिझिर भुट्टो यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता या आधीच अनेकांनी व्यक्त केली होती. आता ती शक्यता सत्यात आली असून पाकिस्तानची स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे.
A firing was reported near the container of former PM and Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) chairman Imran Khan’s container near Zafar Ali Khan chowk in Wazirabad, Pakistan media reports. pic.twitter.com/mv5WvQIm7W
— ANI (@ANI) November 3, 2022
इम्रान खान यांचा लॉंग मार्च
पाकिस्तानी सरकारच्या विरोधात इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा 'लॉंग मार्च'चे (Long March) आयोजन केलं आहे. लाँग मार्चच्या माध्यमातून इम्रान खान यांनी सरकारविरोधात मोर्चा खोलला असून देशातील निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. आज हा मोर्चा गुजरानवाला या ठिकाणी आला होता.
इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर आता पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे सरकार आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेविरोधात इम्रान खान यांनी मोर्चा खोलल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना हा एक प्रकारचा इशारा असल्याचं बोललं जातंय.