Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानच्या शक्तिशाली भूकंपात 2445 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची भीती
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानच्या विनाशकारी भूकंपामध्ये आतापर्यंत 2445 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा आता आणखी वाढला आहे. तालिबान सरकार (Taliban Government) च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामधील मृतांचा आकडा 2000 च्या पुढे गेला आहे. रॉयटर्सतच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान भूकंपामुळे 2445 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले, सर्वात शक्तिशाली भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. अफगाणिस्तानमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हेरात शहराच्या पश्चिमेला 40 किमी अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर शेजारील बडघिस आणि फराह प्रांतातही भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. या भूकंपामुळे हजारो जण जखमी झाले असून अद्यापही शोध आणि बचावकार्य सुरु आहे. तालिबान प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुकंपामुळे 2440 लोक जखमी झाले आहेत.
#Afghanistan Earthquake update: Details released by the Herat Disaster Management directorate
— Tahir Khan (@taahir_khan) October 8, 2023
Total killed 2445
Injured 2440
Houses/Buildings Destroyed totally 1983
20 villages affected in Zindajan district. PM Mullah Hasan orders release of 100 millions afghani initial aid pic.twitter.com/73VP3UQRZc
हेरात प्रांतातील सहा गावं उद्ध्वस्त
हेरात प्रांतात शनिवारी सलग चार भूकंपाचे धक्के बसल्याने मोठं नुकसान झालं आहे. तालिबान सरकारमधील आर्थिक व्यवहार मंत्री अब्दुल गनी बरादर यांनी जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तालिबान सरकारने स्थानिक प्रशासनाला बाधित भागात वेगाने मदतकार्य पोहोचवण्याची विनंती केली आहे. हेरात प्रांतातील सहा गावे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती तालिबानी प्रवक्त्याने दिली आहे.
शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
भकंपग्रस्तांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न तालिबान सरकारकडून सुरु आहे. यूएन ऑफिस ऑफ ह्युमॅनिटेरिअन अफेयर्सने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, हेरात प्रांतात भूकंपामुळे 465 घरे उद्ध्वस्त झाली आणि 135 लोक जखमी झाले. भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्य ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. युनायटेड नेशन्स, स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीने, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना अत्यंत आवश्यक मदत आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :