Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! भरधाव कार कंटेनरला धडकली
Samruddhi Highway Accident: पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
Samrudhhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway Accident) 25 जानेवारीच्या पहाटे एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे बाजूच्या कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला होता. या घटनेला 48 तास पूर्ण होत नाही तर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत एक जण जागीच ठार झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला असून जखमींवर मालेगाव येथे उपचार सुरू आहे. ही घटना वाशिमच्या मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडली.
एकाचा जागीच मृत्यू; तर एक गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावरील मालेगाव लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉरजवळ एक भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा झाला आहे. शकील पठाण हा 27 वर्षीय युवक या अपघातात जागीच ठार झाला असून अनिकेत चंदू जाधव हा 28 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. कार क्रमांक एम एच 12 एस वाय 9488 मध्ये हे दोघे पुण्याहून अमरावती येथे जात होते.
रात्री 11 वाजेच्या सुमारास कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी 108 वर संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधित अधिकारी, डॉक्टर आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात पहाटे किंवा मध्यरात्री
समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात हे पहाटे किंवा मध्यरात्री झाले आहे. या महामार्गावर जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढतच चालले आहे.
हे ही वाचा :