(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha : वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नव्या प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर; पाच गट आणि दहा गणांची वाढ
Wardha Zilla Parishad : वर्धा जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगरपालिकेचा कार्यकाळ संपला असून ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.
Wardha Zilla Parishad : वर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवीन प्रभाग रचनेचे प्रारूप निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. या प्रारूप आराखड्यावर 8 जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.
नवीन प्रभाग रचनेवरून अनेकांना धक्काच बसला आहे. प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर काहींना राजकीय भवितव्याची चिंता भेडसावू लागली आहे. जिल्ह्यात पाच गट आणि दहा गणांची वाढ झाली आहे.
8 जूनपर्यंत आक्षेप नोंदविता येणार
जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगरपालिकेचा कार्यकाळ संपला असून ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्कलमध्येही वाढ करण्यात आली आहे.
प्रभागांमध्ये बदल करण्यात आल्याने काही राजकीय व्यक्तींना धक्का बसला आहे. काहींना याचा फायदा होणार आहे. तर काहींचे नुकसान होणार आहे. या प्रारूप रचनेवर 8 जूनपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये वर्धा जिल्हा परिषदेचे 52 तर पंचायत समितीचे 104 सर्कल होते. या पंचवार्षिकसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून प्रभाग रचनेमध्ये वर्धा, आष्टी, कारंजा, देवळी आणि समुद्रपूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गटाची आणि दोन गणांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदचे 57 सर्कल तर पंचायत समितीचे 114 सर्कल झाले आहेत.
वर्धा जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजपची सत्ता होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. 2017 ला झालेल्या निवडणुकीत 52 पैकी 31 जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले होते. तर काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला होता. राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसपाला प्रत्येकी फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. शेतकरी संघटना आणि रिपाईने प्रत्येकी एक जागा मिळविली होती.
52 पैकी 31 उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. शिवाय राष्ट्रावादीच्या दोन सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. पहिल्या अडीच वर्षात हिंगणघाट तालुक्यातील नितीन मडावी हे अध्यक्ष तर आर्वी तालुक्याच्या कांचन नांदुरकर उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी कारंजा तालुक्याच्या सरिता गाखरे तर देवळी तालुक्याच्या वैशाली येरावार या उपाध्यक्षपदी होत्या.