Wardha Cyber Crime : वर्धा नागरी सहकारी बँक खात्यांवरील सायबर हल्ल्याचा छडा, नायजेरियन नागरिकासह पाच आरोपी अटकेत
Wardha Cyber Crime : वर्धा नागरी सहकारी बँकेचं अकाऊंट हॅक केल्याच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे.
Wardha Cyber Crime : वर्ध्यातील वर्धा नागरी सहकारी बँकेचं (Wardha Nagri Sahakari Bank) अकाऊंट हॅक केल्याच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. येस बँकेची युटिलिटी हॅक करुन बँकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेच्या खात्यातून 1 कोटी 21 लाख 16 हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका नायजेरियन नागरिकाचा समावेश असून तोच या हॅक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता आहे.
येस बँकेत वर्धा नागरी बँकेचं खातं आहे. त्या खात्यातून आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहार होत असतात. 24 मे रोजी बुधवारी बँक बंद असताना पहाटे 6 ते सकाळी 8 या वेळेत येस बँकेची युटिलीटी सायबर चोरट्यांनीनी हॅक करुन सायबर हल्ला केला होता. यामध्ये वर्धा नागरी बँकेच्या खात्यातून तब्बल 1 कोटी 21 लाख 16 हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली. सकाळी बँक उघडल्यावर सर्व कम्प्युटर सुरु करुन तपासणी केली असता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर सायबर सेलकडून पुढील तपास करण्यात येत होता.
तपासासाठी आरबीआयची टीम पाच दिवस वर्ध्यात
या प्रकरणाच्या तपासासाठी आरबीआयची टीम पाच दिवस वर्ध्यात होती. वर्धा पोलिसांच्या टीमची पाच पथके होती. यात एक पथक वर्ध्यात होते. एक पथक बंगळुरु, एक मुंबई, एक दिल्ली आणि एक पथक हैदराबादला गेले होते. वेगवेगळ्या टीमने कौशल्य वापरुन काम केलं. येस बँकेच्या सर्व्हरचा आयपी अॅड्रेस हॅक करणारा बंगळुरुमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलं. तर दिल्ली इथून दोन आणि मुंबई इथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. नायजेरियन नागरिक मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेगवेगळ्या राज्यांत 50 ते 60 अकाऊंटमध्ये रक्कम ट्रान्सफर
आरोपींनी ही रक्कम 50 ते 60 वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली होती. मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, तेलंगाणा, आसाम, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आदी ठिकाणच्या 24 ते 25 बँकांच्या एटीएममधून पैसे काढले होते. 23 लाख 10 हजार रुपये थांबवले आहेत. जवळपास 60 अकाऊंट गोठवले आहेत. 16 एटीएम, 9 मोबाईल, इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. वर्धा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा
Cyber crime: सावधान! सायबर गुन्हेगारी वाढतेय, 'या' तीन मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे होऊ शकते फसवणूक