
Wardha News : पाथरीमध्ये अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू
Wardha News : अंगणवाडीच्या नवीन बांधकामासाठी कॉलमच्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने वर्ध्यातील पाथरी या गावावर शोककळा पसरली आहे.

Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील पाथरी या गावामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणवाडीच्या नवीन बांधकामासाठी कॉलमच्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. या घटनेने पाथरी या गावावर शोककळा पसरली आहे. सार्थक बाळकृष्ण घोडाम असं मृत बालकाचं नाव असून तो पाथरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता.
अंगणवाडीचा खड्डा ठरला जीवघेणा
सार्थक घोडाम काल (11 सप्टेंबर) दुपारी चार वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत आला नव्हता. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची शोधाशोध केली. यावेळी गावात जिल्हा परिषद शाळेजवळ नवीन अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ त्याचा बूट आढळून आला. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अंगणवाडीच्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरले आहे.
रात्री मृतदेह काढला बाहेर, गावकऱ्यांनी व्हिडीओ बनवला
या खड्ड्यामध्ये सार्थकचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील संजय चरडे यांनी अल्लीपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. अल्लीपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास गावातील एका व्यक्तीला खड्ड्यात उतरवून सार्थकचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. हा प्रसंग गावकऱ्यांनी कॅमेरात कैद केला आहे.
खड्ड्याजवळ सूचना फलक नाही
अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ सावधगिरी बाळगण्यासाठी म्हणून सूचना फलक लावायला हवे होते. किंवा त्या जागेवर जनावरे अथवा कोणीही येणार नाही याकरता काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे होता, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. पुढील तपास अल्लीपूर पोलीस करत आहेत. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पुराचा वेढा
वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या जुनी कान्होली या गावाला नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. कालपासून वर्धा जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे छोटे नदी, नाले आणि धरणांच्या पाण्यात देखील वाढ झाली आहे. पुराचे पाणी हे दोन ते तीन फुट कान्होलीच्या रस्त्यांवर आल्यामुळे गावाला पुराचा वेढा बसला आहे. नागरिक मात्र सुरक्षित आहेत आणि नित्याच्या कामासाठी काही नागरिक पुराच्या दोन ते तीन फूट पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. पावसाचा जोर जर कायम राहिला तर नागरिकांना पुन्हा पूर परिस्थितीला समोर जावं लागेल अशी धास्ती कान्होलीच्या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चाणकी ते भगवान रोड पुरामुळे बंद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
