Walmik Karad: वाल्मिक कराड आता किमान 6 महिने सुटणे अशक्य; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय, पुढे काय होणार?
Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case: वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case: सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज (22 जानेवारी) बीड जिल्हा विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता इथून पुढे वाल्मिक कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी न्यायालयात गेले, तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपी जामीन मिळत नाही. त्यामुळे किमान पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे.
वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-
दरम्यान, वाल्मिक कराड याने 31 डिसेंबरला पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्कारली होती. तेव्हापासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात त्याच्या सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी...
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीला ज्या-ज्या वेळी तपासासाठी वाल्मिक कराडची गरज असेल. त्या त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने सीआयडी कराडची चौकशी करु शकते. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची पोलिस कोठडीची गरज असल्या सीआयडी न्यायालयाकडे पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करु शकतात.
संतोष देशमुखांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, आरोपींना फाशी द्या- धनंजय मुंडे
मी याबाबतीत काहीही उत्तर देणार नाही. कृपा करून मला याबाबत प्रश्न विचारू नका. मी स्पष्ट सांगितलंय, स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत. ज्यांनी निर्घृणपणे हत्या केली, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवून तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे काय म्हणाले?
तपासात कुठल्यावेळी कोठडीत घेण्याचा अधिकार आबादित ठेवून एसआयटीने वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी मागितली आहे. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी जरी मिळाली असली तरी एसआयटीला केव्हाही पोलीस कोठडी मिळू शकते. कोठडीचा आधिकार आबादीत ठेवूनच एसआयटीने न्यायालयीन कोठडी घेतली आहे, अशी माहिती सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.