Suresh Dhas Walmik Karad: वाल्मिक कराडने विधानसभा निवडणूक लढवण्याची केली होती तयारी; महायुतीमुळे फिस्कटलं अन्...
Suresh Dhas Walmik Karad: सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादच्या कारणांसंदर्भात बीडमध्ये नेमकी चर्चा काय सुरु आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

Suresh Dhas Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले. तसेच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात आता समेट झाला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र भेटीची बातमी फोडणं हे आपल्याविरोधातलं षडयंत्र असून त्याचा बंदोबस्त करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे. दरम्यान, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादच्या कारणांसंदर्भात बीडमध्ये नेमकी चर्चा काय सुरु आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आष्टी पाटोदा मतदारसंघातून जर सर्व पक्ष वेगळे लढले तर तेथील वंजारी समाजाचे मतदान पाहता वाल्मिक कराड (Walmik Karad) याने त्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र महायुती म्हणून लढल्याने भाजपच्या सुरेश धस यांना संधी मिळाली. याचा राग सुरेश धस यांच्या मनात असल्याची देखील चर्चा बीडमध्ये आहे. सुरेश धस यांच्या सांगण्याप्रमाणेच पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असले तरी काम वाल्मिक कराडच पाहत होता. आष्टीत सुरेश धस यांच्या पत्नी यांच्या विरोधात एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दाखल करायला लावल्याचा सुरेश धस यांना संशय होता. त्यामुळे ही सुरेश धसांच्या मनात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा राग होता अशी बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चा असते.
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट-
धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सुरेश धस यांच्यावर आरोपांची राळ उठलीय. त्यावर भेटीचं बातमी फोडणं हे आपल्याविरोधातलं षडयंत्र असून त्याचा बंदोबस्त करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिलाय. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचही त्यांनी सांगितलंय. दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची दोनदा भेट झाली. तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानीही दोघे भोजनासाठी एकत्र आले होते. या दोन्ही भेटींच्या तारखा मात्र अद्याप कळू शकल्या नाहीत. यासंदर्भात बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी भेटीची तारीख सांगण्यास नकार दिलाय. त्यामुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. मात्र त्यानंतर इतक्या दिवसांनी यासंदर्भात माहिती बाहेर आणणारी व्यक्ती धनंजय मुंडेंच्या जवळची आहे का भाजपची कोणी आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि सुरेश धस कोणाचं नाव घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सुरेश धस अन् धनंजय मुंडेंच्या भेटीवर अजित पवार काय म्हणाले?
एकीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर विरोधकांनी राळ उठवलीये. मात्र दुसरीकडे या भेटीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समर्थन केलंय. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीत गैर काय?, असा प्रतिसवालच अजित पवारांनी केलाय. माणुसकीच्या नात्याने दोन्ही नेत्यांची भेट झाली, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.तर या भेटीच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबीयांच्या भावनाही योग्यच असल्याची सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
























