Nagpur News: नागपुरातील हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचं स्पष्टीकरण; म्हणाले, कोणाच्या भावना दुखावतील असं...
Vishwa Hindu Parishad : विहिपच्या आंदोलनामुळे वातावरण बिघडलं असं म्हणणं चूक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे (Govind Shende) यांनी व्यक्त केले आहे.

Nagpur News: विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने सोमवारी महाल परिसरात केलेला आंदोलन क्रुरकर्मा औरंगजेबच्या विरोधात होतं. आमच्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कुठलेही कृत्य आम्ही केलेले नाही. प्रतिकात्मक पुतळ्यावर कुठलीही धार्मिक चादर किंवा कापड नव्हता. त्यामुळे विहिपच्या आंदोलनामुळे वातावरण बिघडलं असं म्हणणं चूक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे (Govind Shende) यांनी व्यक्त केले आहे.
नागपुरात हिंसाचार घडवण्यामागे बाहेरील शक्तींचा हात- गोविंद शेंडे
औरंगजेब आमचा बाप आहे, आलमगीर औरंगजेब जिंदाबाद अशा घोषणा महाल परिसरातील छत्रपती शिवाजी चौकावर तसेच गणेश पेठ पोलीस स्टेशनच्या समोर देण्यात आल्या. असा प्रकार आम्ही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. औरंगजेबचे समर्थन महाराष्ट्रात कोणीही करू नये, असेही गोविंद शेंडे म्हणाले. दरम्यान सकाळी विश्व हिंदू परिषदेचा आंदोलन, दुपारी काही मुस्लिम तरुणांनी त्यास केलेला विरोध, यानंतर सर्वकाही शांत झालं होतं.
चार तासानंतर हा हिंसाचार सुनियोजित पद्धतीने घडवून आणण्यात आला, असा आरोपही शेंडे यांनी केला आहे. दरम्यान त्यादिवशी शिवाजी चौकाजवळच्या मशिदीत नेहमीच्या तुलनेत अत्यंत जास्त संख्येने लोक आले होते, ते त्या ठिकाणी का आले होते? याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. नागपुरात हिंसाचार घडवण्यात आलं असून त्यामागे बाहेरील शक्तींचा हात आहे, असा आरोपही शेंडे यांनी केला.
विहिप आणि बजरंग दलाच्या नऊ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
दरम्यान सोमवारी सकाळी झालेल्या आंदोलनात गोविंद शेंडे यांच्यासोबत असलेले अमोल ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. प्रतीकात्मक पुतळ्यावर कुठलीही धार्मिक चादर किंवा कापड नव्हताच. आम्ही एवढ्या वर्षांपासून आंदोलन करतो आहे, आम्ही मूर्ख नाही, की आम्ही असे कृत्य करू असे अमोल ठाकरे म्हणाले. त्यादिवशीच्या आंदोलनासंदर्भात विहिप आणि बजरंग दलाच्या नऊ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असून आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, अशी हमी ही विहिपच्या नेत्यांनी दिली आहे.
हे ही वाचा























