एक्स्प्लोर
5 एकर मोसंबी बाग, 25 लाखांचं उत्पन्न, विनोद परदेशींची यशोगाथा
जळगाव: नोटाबंदीच्या काळात मोजक्या शेतकऱयांच्याच चेहऱ्यावर हास्य, समाधान उरलं होतं, त्यातले एक शेतकरी आहेत चाळीसगाव तालुक्यातल्या हातले गावचे विनोद परदेशी. 3 वर्ष पाण्याची टंचाई असताना त्यांनी दर्जेदार मोसंबी उत्पादन मिळवलं, पाच एकर मोसंबी बागेतून पंचवीस लाखांचं उत्पन्न मिळविणं सोपं काम नव्हतं, कशी साधली त्यांनी ही किमया, त्याचा हा आढावा.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात हातले गाव आहे. या गावच्या विनोद परदेशी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतीत एक गुंतवणूक केली होती. त्याची गोड फळं त्यांना चाखायला मिळू लागली आहेत, ही गुंतवणूक म्हणजे मोसंबी लागवड.
मोसंबीची बागच २०१६ मध्ये त्यांना लखपती बनवून गेली. पारंपरिक पिकांना फाटा देत पाच वर्षापूर्वी त्यांनी मोसंबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त पाच एकरात दर्जेदार मोसंबी उत्पादनातून २५ लाखांचा फायदा मिळविण्यात त्यांना यश आले आहे.
मोसंबीची लागवड 2010 मध्ये केली. पहिल्या वर्षी केळीमध्ये लागवड केली. त्यानंतर एकदा केळी काढल्यानंतर आंतरपीक म्हणून नवीन छोटी छोटी पीकं, जशी कोबी, फ्लॉवर, टरबूज घेतले. या भागात पाण्याची बिकट परिस्थिती होती. पण मल्चिंग पेपरचे बेड तयार केले. त्यावर टरबूज लागवड केली. त्यामुळे टरबूजपण चांगले आले आणि मोसंबी बागही फुलली, असं विनोद सांगतात.
या परिसरात पाण्याची टंचाई ठरलेली, परदेशी यांच्याकडील 20 एकर शेतीला 3 विहिरींचं पाणी कमी पडायचं. जवळपास पाच एकर शेती कोरडवाहूसारखी कसण्याशिवाय पर्याय नाही. या शेतीत पाणी वाचवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करत असतात.
सिंचनासाठी इनलाईन ड्रिपचा ते वापर करतात. तसंच मोसंबीमधल्या जागेत मल्चिंग करुन टरबूज लागवड केली होती, त्यातून गेल्या उन्हाळ्यात त्यांनी पाच लाख रुपये मिळवले होते. या मल्चिंगचा फायदा मोसंबीलाही झाल्याचं ते सांगतात.
काटोल- गोल्ड जातीची ही मोसंबी लागवड आहे, लागवडीतील अंतर विनोद परदेशी यांनी अठराबाय अठरा फूट ठेवलंय. त्यामुळे सुरुवातीचे तीन वर्ष विविध आंतर पिके घेण्यात त्यांना यश मिळाले आहे.
वेळच्या वेळी खतांची मात्रा ते देतात तसंच एकात्मिक नियंत्रण पद्धतीने कीड रोगांपासून बागेचं संरक्षणही करतात. या व्यवस्थापनामुळेच मोसंबी फळांचा दर्जा चांगला राहिल्याचं ते सांगतात.
तीन वर्षानंतर यंदा राज्यभर दमदार पाऊस झाला, पण बऱ्याच भागात मोसंबी पिकाचे नुकसानही झालं. मात्र विनोद परदेशी यांचं योग्य व्यवस्थापन आणि त्याला त्यांच्या निचऱ्याच्या जमिनीने दिलेली साथ यामुळे पाच एकरात त्यांना चाळीस टन मोसंबीचे उत्पादन आलं आहे. बाजार पेठेत या दर्जेदार मोसंबीला मोठी मागणी आणि किलोला ६९ रुपये एवढा भाव मिळाला आहे.
यावर्षी शेणखतं वगैरे फवारणी पकडून तीन लाख रुपये खर्च आला. पहिला भार चौथ्या वर्षी आला. त्यातून तीन लाख रुपये मिळाले. दुसऱ्या भारापासून 40 टन उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. एकूण 70 हजार रुपये प्रती टन असा दर आहे. त्यामुळे सुमारे 27 लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळेल.
मेहनतीचं चीज झाल्याची भावना परदेशी बोलून दाखवतात. मोसंबी बागेचं गणित जुळून आल्याचं समाधान यांच्या बोलण्यातही जाणवतं आणि चेहऱ्यावर सुद्धा दिसतं.
विनोद परदेशी यांची दर्जेदार मोसंबी बाग आणि त्यांना मिळालेला दर पाहून परिसरातील अनेक शेतकरी या मोसंबीच्या रोपाची मागणी त्यांच्याकडे करू लागले आहेत.
ही मागणी लक्षात घेऊन त्यांनी रोपवाटीका सुरु केली आहे, येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपं मिळतील आणि परदेशी यांना उत्पन्नाचं आणखी एक साधन मिळेल.
प्रतिकूल परिस्थितीत चांगलं काम करत राहायचं, संधी निर्माण करायची आणि त्या संधीचं सोनं करायचं ही कला विनोद परदेशींनी साधली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement