Vidarbha Weather Update: विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा! राज्यात वाशिम सर्वाधिक उष्ण, पारा 35 अंशावर
Vidarbha: विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 35 अंश सेल्सिअसच्या आकडा पार केला आहे. आज मंगळवारी विदर्भात वाशिम जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये नोंद झाली आहे.
Vidarbha Weather Update : विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा (Vidarbha Heat) सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 35 अंश सेल्सिअसच्या आकडा पार केला आहे. आज मंगळवारी विदर्भात वाशिम(Washim) जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान 39. 4 अंश सेल्सिअस, तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये (Yavatmal) 39.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
सोमवारच्या तुलनेत आज कमाल तापमानात सरासरी तीन ते साडेतीन अंशाने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे विदर्भात किमान आणि कमाल तापमान हे एकट्या वाशिम जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेच्या झळा बघता दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ देखील कमी झाल्याचे चित्र आहे.
विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा!
सध्या महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. आज राज्यात सर्वाधिक तापमान वाशिम येथे 39. 4 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. तर मध्य महाराष्ट्रातही सोलापूर 39. 2 अंश सेल्सिअस, मालेगाव 38. 4 अंश सेल्सिअस, सांगली 38. 6 अंश सेल्सिअस येथे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण झाल्यामुळे कमाल-किमान तापमानात वाढ झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवकाळीचे ढगही विरले आहेत. असे असताना विदर्भात उष्णतेने सध्या तापमानाचा उच्चांक गाठल्याचे चित्र आहे. आगामी काळात तापमानात काही अंशी सातत्याने वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
असे आहे विदर्भाचे आजचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 38.4 | 20.2 |
अमरावती | 37.0 | 20.7 |
बुलढाणा | 35.5 | 21.8 |
ब्रम्हपुरी | 37.4 | 22.0 |
चंद्रपूर | 38.0 | 20.4 |
गडचिरोली | 35.6 | 20.4 |
गोंदिया | 36.0 | 19.4 |
नागपूर | 37.4 | 19.8 |
वर्धा | 38.6 | 21.0 |
वाशिम | 39.4 | 18.8 |
यवतमाळ | 39.0 | 20.5 |
राज्यातलं वातावरण कसं असेल?
राज्यातील किमान तापमानात अजूनही चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. त्यामुळे सकाळी उकाडा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत सोमवारी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदविण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-