Bobby Kataria : ‘ते शूटिंगसाठीचं डमी विमान होतं’, धुम्रपानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाची सारवासाराव! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Bobby Kataria : विमानात सिगारेट ओढत असतानाच्या व्हिडीओवर टीका होत असताना आता बॉबीने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे
Bobby Kataria : विमानात एक व्यक्ती सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) होत होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना टॅग करत अनेकांनी याची तक्रार देखील केली. या व्हिडीओमध्ये दिसणारा हा व्यक्ती सोशल मीडिया स्टार बॉबी कटारिया (Bobby Katria) आहे. विमानात सिगारेट ओढत असतानाच्या व्हिडीओवर टीका होत असताना आता त्याने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्या व्हिडीओतील विमान हे शूटिंगसाठीचं डमी विमान होतं, असं त्याने म्हटलं आहे.
‘आपण विमान प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाचा जीव धोक्यात टाकलेला नाही. ते विमान शूटिंगसाठीचे डमी विमान होते. तो आमच्या शूटिंगचा एक भाग होता. विमानात लायटर आणि सिगारेट नेता येत नाही, हा नियम मला माहित आहे. आणि मी कोणताही नियम मोडलेला नाही’, असे बॉबी कटारियाने म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बॉबी कटारियाचा हा व्हिडीओ 23 जानेवारी 2022चा आहे. विमानात सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीचे नाव बलविंदर कटारिया उर्फ बॉबी कटारिया आहे. बॉबी कटारिया सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्याचा हा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. रिपोर्ट्सनुसार, 23 जानेवारी 2022 रोजी बलविंदर कटारिया दुबई ते दिल्लीला स्पाइसजेटच्या विमानाने प्रवास करत होता. त्यादरम्यान हा व्हिडीओ बनवण्यात आला. मात्र, नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला. एव्हिएशन सिक्युरिटीने बलविंदरवर कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेटकऱ्यांचा तक्रारीचा सूर
उत्तराखंडमधील खानपूरचे आमदार उमेश कुमार यांनी हा व्हिडीओ ट्विट करून गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून तक्रार केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका वापरकर्त्याने नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना हा व्हिडीओ टॅग केला. यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उत्तरात लिहिले की, ‘आम्ही याची चौकशी करत आहोत. अशा धोकादायक कृत्यांना सहन केले जाणार नाही.’
काय म्हणाले स्पाइसजेट?
फ्लाईटमध्ये सिगारेट ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पाईसजेट एअरलाईनने यावर स्पष्टीकरण दिले आहे. विमान कंपनीने सांगितले की, ‘विमानामध्ये सिगारेट ओढतानाचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्याचा तपास जानेवारी 2022मध्ये पूर्ण झाला आहे. या प्रकरणाबाबत गुरुग्राममधील उद्योग विहार पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती, असे एअरलाईनने म्हटले आहे.
इतर संबंधित बातम्या