Fact Check : Facebook तुमचे फोटो आणि वैयक्तिक माहिती वापरणार आहे का? व्हायरल पोस्टमागे सत्य काय?
Facebook Viral Post Fact Check : 2023 मध्येही अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल झाली होती. फेसबुक तुमचे फोटो आणि इतर माहिती वापरणार अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत होता.

Facebook Fact Check : गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर एक विशेष प्रकारची पोस्ट अनेकांच्या वॉलवर दिसत आहे. या पोस्टमध्ये लोक लिहित आहेत की ते Facebook ला त्यांच्या फोटो किंवा वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी देत नाहीत. यासोबतच इतर मित्रांना ही पोस्ट कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वॉलवर टाकण्याचे आवाहन केले जाते. पोस्टमध्ये दावा आहे की असे न केल्यास फेसबुकला कायदेशीर हक्क मिळून तो डेटा वापरू शकेल.
Facebook Viral Post : नेमकी काय आहे पोस्ट?
"माझे वैयक्तिक फोटो आणि माहिती वापरासाठी फेसबुकला कोणतीही परवानगी देत नाही, गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतो."
Facebook Viral Post Fact Check : या पोस्टमागची सत्यता काय आहे?
जेव्हा कोणी फेसबुक अकाउंट तयार करतो, तेव्हा तो फेसबुकच्या अटी व शर्ती मान्य करतो. यात फेसबुक कोणता डेटा गोळा करेल आणि कसा वापरेल, याची माहिती दिलेली असते. जर तुम्हाला तुमचा डेटा कमी प्रमाणात वापरला जावा असे वाटत असेल, तर फेसबुकवरील सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी कंट्रोल्स वापरणे हा एकमेव मार्ग आहे. कुठलीही 'कॉपी-पेस्ट पोस्ट' यात बदल करू शकत नाही.
फेसबुकद्वारे वापरकर्त्यांचे फोटो आणि इतर वैयक्तिक माहिती वापरण्याचा दावा करत असलेली पोस्ट ही चुकीची आहे, त्यासंबंधी व्हायरल दावा चुकीचा आहे हे फॅक्ट चेकमधून समोर आलं आहे. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
फेसेबुकवर व्हायरल होणारी ही पोस्ट काही नवी नाही. 2023 मध्येही अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल झाली होती. फेसबुक तुमचे फोटो आणि इतर माहिती वापरणार अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत होता. त्यावर Newschecker ने फॅक्ट चेक केलं होतं आणि व्हायरल दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं.
फेसबुक कोणता डेटा गोळा करते?
- नाव, जन्मतारीख, ग्रुप्स, आणि डिव्हाइसवरून अपलोड केलेला कॉन्टॅक्ट डेटा.
- तुम्ही कोणते फीचर्स जास्त वापरता आणि तुम्हाला कोणते कंटेंट आवडतात याची नोंद.
- डिव्हाइसची माहिती जशी की ऑपरेटिंग सिस्टिम, बॅटरी लेव्हल, नेटवर्क, ब्राउझर, लोकेशन.
ही माहिती काही प्रमाणात सेटिंग्समध्ये बदल करून कमी करता येते, पण पोस्ट टाकून काहीही फायदा होत नाही.
अफवा नव्हे, धोका वाढवते
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, अशा पोस्ट्स हॅकर्ससाठी रेकीसारख्या असतात, म्हणजे कोण असे आहेत जे कोणतीही फॅक्ट चेक न करता अशा पोस्टवर विश्वास ठेवतात याची माहिती त्यांना मिळते. त्यामुळे प्रायव्हसीची सुरक्षा तर होत नाहीच, उलट तुम्ही फसवणुकीच्या निशाण्यावर येऊ शकता.
Facebook Privacy Policy : प्रायव्हसी जपण्यासाठी काय करावे?
- प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जाऊन पोस्ट, फोटो आणि प्रोफाइल कोण पाहू शकतो ते ठरवा.
- Off-Facebook Activity बंद करा, थर्ड-पार्टी ॲप्स तपासा आणि गरजेचे नसलेले हटवा.
- Ad Preferences मधून जाहिरातींवर नियंत्रण ठेवा.
- संवेदनशील माहिती, लोकेशन किंवा वैयक्तिक तपशील सार्वजनिकरित्या पोस्ट करू नका.
- पूर्ण प्रायव्हसी हवी असल्यास, एकमेव पर्याय म्हणजे फेसबुक अकाउंट डिलीट करणे. तरी काही डेटा फेसबुककडे राहू शकतो.
फेसबुकवर व्हायरल होत असलेला हा प्रायव्हसी पोस्ट हा फक्त अफवा आहे. प्रायव्हसीसाठी प्रत्यक्ष परिणाम देणारी पायरी म्हणजे सेटिंग्समधून नियंत्रण ठेवणे आणि कोणत्याही संदेशावर आंधळा विश्वास न ठेवणे.























