Gemini ला कसं कळलं हातावर तीळ आहे? रेट्रो साडीतील ट्रेंड करताना तरुणीला आला भीतीदायक अनुभव, युजर्स चक्रावले
एआयने असा काहीतरी तपशील पकडला, जो अपलोड केलेल्या इमेजमध्ये दिसतच नव्हता. झलकने यावर व्हिडिओद्वारे चिंता व्यक्त केली.

Gemini AI Saree Trend: गेल्या काही आठवड्यांपासून गुगल जेमिनीचं नॅनो बनाना टूल सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडिंग आहे. कुणी थ्रीडी इमेजेस तयार करतंय, तर कुणी रेट्रो लूकमध्ये फोटो काढून पोस्ट करतंय. पण आता या टूलच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण एका इन्स्टाग्राम युजरने तिच्यासोबत घडलेला अनुभव शेअर केल्यावर हजारो लोकांना स्वतःच्या प्रायव्हसीची चिंता वाटू लागली आहे. (AI Saree Trend)
झलक भवनानीचा धक्कादायक अनुभव
इन्स्टाग्राम युजर झलक भवनानी हिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात तिने सांगितलं की, तिने जेमिनी ट्रेंड फॉलो करून नॅनो बनाना फीचर वापरलं होतं. सुरुवातीला सगळं मजेत चाललं होतं. तिने एक फोटो अपलोड करून "रेट्रो साडी" प्रॉम्प्ट दिलं आणि काही क्षणांतच तिचा काळ्या साडीतील सुंदर फोटो तयार झाला. तिने तो आनंदाने सोशल मीडियावर देखील टाकला.
पण नंतर तिने बारकाईने फोटो पाहिला आणि तीच थक्क झाली. अपलोड केलेल्या मूळ फोटोत तिच्या हातावरचा तीळ अजिबात दिसत नव्हता. मात्र जेमिनीने तयार केलेल्या साडीतील फोटोमध्ये तो तीळ स्पष्ट दिसत होता. म्हणजेच, एआयने असा काहीतरी तपशील पकडला, जो अपलोड केलेल्या इमेजमध्ये दिसतच नव्हता. झलकने यावर व्हिडिओद्वारे चिंता व्यक्त केली "माझा तीळ Gemini ला कसा दिसला?" हा प्रश्न आता नेटिझन्सना चक्रावून टाकतोय.
सोशल मीडियावर चर्चा रंगली
झलकचा व्हिडिओ व्हायरल होताच हजारो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिच्या अनुभवाशी सहमती दर्शवली, तर काहींनी यामागे विविध थेअरीज मांडल्या. एका युजरने लिहिलं, "गुगलचं हे टूल असल्यामुळे त्याला तुमच्या गुगल अकाउंट आणि आधी अपलोड केलेल्या फोटोंमधून डेटा मिळू शकतो. त्यामुळे असे हिडन डिटेल्स ओळखले जात असावेत." आणखी एका युजरने कमेंट केली, "माझ्याबाबतीतही असंच घडलंय. फोटो अपलोड केला तेव्हा एका छोट्या खुणा दिसत नव्हत्या, पण Gemini ने आउटपुटमध्ये दाखवल्या." या चर्चांमुळे जेमिनी टूलबद्दलची शंका आणखी वाढली आहे.
View this post on Instagram
गुगलचा दावा, टूल सुरक्षित
दुसरीकडे, गुगलने यापूर्वी दिलेल्या अधिकृत निवेदनात नॅनो बनाना टूल सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. कंपनीच्या मते, हे टूल युजर्सने अपलोड केलेल्या फोटोंवरच आधारित काम करतं आणि त्यापलीकडे कोणतीही माहिती साठवत नाही. मात्र झलकच्या घटनेनंतर अनेक युजर्सना आता या दाव्याबद्दल शंका निर्माण होऊ लागली आहे.
प्रायव्हसीचा प्रश्न गंभीर
आजकाल एआय टूल्स वापरणं हा तरुणाईचा नवा ट्रेंड झाला आहे. पण त्याचबरोबर प्रायव्हसीचा प्रश्नही मोठा होत चालला आहे. नॅनो बनाना टूल नेमकं कसं काम करतं? ते फोटोंव्यतिरिक्त इतर डेटाचा वापर करतं का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. झलक भवनानीच्या या पोस्टनंतर अनेक युजर्स आता सावध झाले आहेत. कुणी प्रायव्हसी सेटिंग्ज तपासत आहेत, तर कुणी या फीचरचा वापरच न करण्याचा निर्णय घेतला आहे.
























