Bihar: बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरूणी रोज घालवायची गावाची लाईट, आख्खा गावात व्हायचा काळोख; गावकऱ्यांना समजताच लावून दिलं लग्न
Bihar Love Story : बॉयफ्रेंडला भेटता यावं यासाठी ती आख्ख्या गावाची लाईट घालवायची, दुसरीकडे रोज रात्री लाईट जाते म्हणून गावकरी मात्र हैराण व्हायचे.
Bihar Viral Love Story : प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे लोक काही कमी नाहीत आपल्याकडे. शोधले तर एकेक नग सापडतील असे. कोण प्रेयसीसाठी गाड्या चोरतो, तर कोण दरोडा टाकतो. बिहारमध्येही असाच काहीसा प्रकार घडला असून प्रेमासाठी एक तरूणी आख्ख्या गावाला अंधारात ठेवायची. बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी ही तरूणी रोज गावाची लाईट घालवायची आणि रात्री गाव अंधारात जायचा. गावकऱ्यांना हे समजताच त्यांनी या दोघांचं लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे. बिहारमधील ही लव्ह स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.
बिहारच्या बेतिया येथील एका मुलीने तिच्या प्रियकराला अंधारात भेटण्यासाठी संपूर्ण गावाची वीज तोडली. प्रीती असे या तरुणीचे नाव असल्याचं सांगितले जात आहे. ती प्रत्येक वेळी प्रियकर राजकुमारला भेटण्यासाठी गावाची लाईट घालवायची. मात्र एकदा हे रंगेहात सापडले आणि यांचे भांडं फुटलं.
राजकुमारचे प्रीती कुमारीसोबतच्या असलेल्या अफेअरवरून पश्चिम चंपारणमधील दोन गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून तणाव निर्माण झाला होता. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. जेव्हा लोकांना वारंवार लाईट जाण्यामागचं खरं कारण कळलं तेव्हा सर्वांच्याच रागाचा पारा मात्र चढला.
इंडिया टुडेने या संबंधित एक वृत्त प्रकाशित केलं होतं. गोविंद चौधरी नावाच्या एका गावकऱ्याने सांगितले की, "प्रीती रोज रात्री गावाची वीज खंडित करत असे. त्यामुळे गावात अनेक चोरीच्या घटना घडत होत्या. त्या मुलीमुळे आम्हाला त्रास झाला. अनेकवेळा गावकऱ्यांनी वीज विभागाकडे वीज खंडित झाल्याची तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही."
ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या
अनेकदा तक्रार करूनही काहीही झाले नाही, तेव्हा गावकऱ्यांनीच वीज खंडित होण्यामागचे कारण शोधायचे ठरवले. पुढच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तेव्हा त्यांनी राजकुमार आणि प्रितीला त्यांनी एकत्र पकडले आणि त्यांना धक्काच बसला.
तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
यावेळी रागाला आलेल्या गावकऱ्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या तरूणाने आपल्या मित्रांना बोलावून गावकऱ्यांवर हल्ला केला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये राजकुमारला गावकरी काठीने मारहाण करत आहेत आणि त्याची मैत्रीण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय.
मंदिरात लग्न लावून दिलं
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी आख्ख्या गावाची लाईट घालवणाऱ्या या तरूणीला लोकांनी पकडले. नंतर या दोघांचेही गावातील मंदिरात लग्नही लावून दिलं. असं असलं तरी प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या या तरूणीच्या कृत्याची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे.
ही बातमी वाचा: