Nagpur : सुपर स्पेशालिटी रुग्णालय 'सलाईन'वर, एकाही विभागात विभागप्रमुख नाही
विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांसाठीही वरदान ठरत असलेला सुपर स्पेशालिटी सलाईनवर आहे. येथील सर्व सहाही विभाग विभाग प्रमुखांशिवाय असून एप्रिलपासून विशेष कार्य अधिकारी पदही रिक्त आहे.
नागपूरः दररोज हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एकाही विभागात विभागप्रमुख नसून दोन महिन्यांपासून विशेष कार्य अधिकाऱ्यांची खुर्ची रिकामी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालयच सलाईनवर असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
30 वर्षांनंतरही दर्जा नाही
मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीची घोषणा झाली त्यावेळी 380 खाटांची पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम अनुसंधान संस्था आणि अतिविशेषोपचार रुग्णालय असे स्वरुप होते. परंतु 30 वर्षानंतरही सुपर स्पेशालिटी 230 खाटांवरच मर्यादित आहे. मात्र मध्य भारतातील गरिबांसाठी वरदान ठरले आहे. सुपर स्पेशालिटीचा दर्जा वाढविण्यासाठी शासन-प्रशासनाकडून घोषणा होतात. मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाची विदर्भाकडे बघण्याची पक्षपाती नजर असल्यामुळेच 30 वर्षांनंतरही सुपरला सुपर स्पेशालिटीचा दर्जा मिळाला नाही.
एप्रिल 2022मध्ये विशेष कार्य अधिकारी डॉ. संजय पराते निवृत्त झाले. ही खुर्ची रिकामी झाली. तेव्हापासून या खुर्चीवर कोणाची निवड करावी हाच खरा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासनाने या खुर्चीत डॉ. वंदना अग्रवाल यांना नियुक्ती दिली होती, परंतु त्यांचा आदेश मध्येच रद्द करण्यात आला. तर डॉ. फातिमा वली यांचा आदेश काढण्यात आला. मात्र त्या क्लिनिकल विभागाच्या असल्यामुळे नियमावर बोट ठेवून त्यांनी हे पद स्वीकारले नाही. याशिवाय सुपरमधील सर्वच विषयाचे विभाग प्रमुख पदे रिक्त आहेत.
विभाग प्रमुखांशिवाय विभाग
- ह्रदयरोग विभागः डॉ. मुकुंद देशपांडे निवृत्त झाल्याने पद रिक्त आहे.
- पॅथॉलॉजी विभागः डॉ. संजय पराते निवृत्त झाल्याने पद रिक्त आहे.
- नेफ्रोलॉजी विभागः डॉ. चारुलता बावनकुळे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकाऱ्याने पद रिक्त आहे.
- इंडोक्रायनोलॉजिस्टः डॉ. सुनील अंबुलकर यांची सेवा प्रशासनानेच समाप्त केली आहे.
- युरॉलॉजी विभागः या विभागात विभागप्रमुखच नाही, सहयोगी प्राध्यापक सांभाळतात कार्यभार.
- बायोकेमिस्ट्री विभागः डॉ. संजय सोनूने पदोन्नतीने अधिष्ठाता बनून बदलून गेल्याने पद रिक्त आहे.