ठाण्यातील घोडबंदर रोडवर उलट्या दिशेने घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार; प्रशासनाचा मोठा निर्णय
Ghodbunder Road: गेल्या पंधरा दिवसात घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे.
Ghodbunder Road ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांची वाहतूक कोंडी आणि त्यात महामार्गावरून उलट दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 'टायर किलर'चा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता घोडबंदर रोडवर उलट्या दिशेने घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार असून 'टायर किलर' बसविण्याचे स्पॉट लवकरच निश्चित केले जाणार आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात 'टायर किलर' काम करणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तरिते बैठक घेऊन माहिती देण्यात आलेली आहे.
गेल्या पंधरा दिवसात घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना सातत्याने केल्या जात होत्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत या महामार्गावरील अनेक ठिकाणी उलट्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असल्याने वाहतूक कोंडी वर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा उपाययोजना तसेच अडचणी याचा विचार करण्यासाठी बैठकीचे आयोजन ठाणे महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते.
पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होत असल्याचे समोर-
दोनशे टनाच्या गाड्या गायमुख घाटातून जातात त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होत असल्याचे समोर आल्यानंतर काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची बाब समोर आली. त्याचबरोबर, कापूरबावडी- माजीवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या यु टर्न ते विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकर केले जाणार आहे. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
12 टनापेक्षा जास्त मालवाहू वाहने अवजड वाहन-
वाहतूक कोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. मात्र मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होता. मात्र आता 12.5 टन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने असल्याचे घोषित करण्यात आले. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नसल्याचे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली. तसेच गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली.
सर्व यंत्रणांची कामे तात्काळ होणार-
मेट्रोलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका छोट्या झाल्या असल्याने सेवा रस्ते अधिक सक्षम करावे, अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रस्ते खड्डेमुक्त, समान पातळीचे असतील. त्यावर कुठेही उंचवटे तयार होणार नाहीत, याची खात्री सर्व यंत्रणा करणार आहेत. त्याचबरोबर, सेवा रस्ते फेरीवाला मुक्त करणे, पार्किंग हटवणे आणि ओव्हरहेड वायरचा बंदोबस्त करणे ही कामे तत्काळ होणार आहेत.
उलट्या दिशेची वाहतूक रोखण्यासाठी ठाण्यातही होणार 'टायर किलर'चा प्रयोग-
रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर 'टायर किलर' बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे 'टायर किलर' बसवण्यात येतील.हे 'टायर किलर' बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल. अशा प्रकारचे 'टायर किलर' असल्याची माहिती देणारे बोर्ड 100 ते 200 मीटर आधीपासून लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर मग हे 'टायर किलर' बसवले जातील. त्यांच्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल, असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.