Jitendra Awhad: विवियाना मॉल मारहाण प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर, 15 हजारांच्या कॅश बाँडवर सुटका
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या कॅश बाँडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आधी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ निर्माण झाला आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये वादावादी झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जवळपास 100 कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येतंय. या दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवल्याचं दिसून येतंय.
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीनाला तपास अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना 15 हजारांच्या कॅश बॉंडवर जामीन मंजूर केला.
तपास अधिकाऱ्यांचा जामीनाला विरोध
आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन देवू नये असा अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी ठाणे कोर्टात दिला होता. जितेंद्र आव्हाड हे बलवान राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात बाधा आणू शकतात, तसेच साक्षीदारांना धमकावू शकतात असा अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी दिला होता.
प्रकरण नेमकं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.