Karvele Viral Video : धक्कादायक! भुताटकीच्या संशयातून 75 वर्षीय वृद्धाला आगीच्या निखाऱ्यावर नाचवले, वृद्ध होरपळून गंभीर
Black Magic : सुरुवातीला राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण नंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
ठाणे : गावात अघोरी कृत्य करून भुताटकी (Black Magic) करण्याच्या संशयातून ग्रामस्थांच्या जमावाने एका 75 वर्षीय वृद्धाला निर्दयीपणे आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे (Gram Panchayat Karvele Viral Video) गावात घडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील मुरबाडमधील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण भावार्थे असे होरपळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर दुसरीकडे या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे वयोवृद्ध कुटुबासह राहतात. या गावातील काही ग्रामस्थांना संशय होता की, लक्ष्मण हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भुताटकी करतात.
निखाऱ्यावर नाचवलं, मारहाण केली
त्यातच 4 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केरवेळे गावात मंदिरासमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या रात्री जागरणाचा गोंधळ सुरू असताना गावातील राहणाऱ्या 15 ते 20 जणांनी वृद्ध लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर त्यांना जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले आणि आग पेटवली होती त्या आगीच्या निखाऱ्यावर नाचवले.
हा भयानक प्रकार करत असतानाच, वृद्ध लक्ष्मण यांना काही तरुण ग्रामस्थांनी 'तू करणी करतो' असे म्हणून त्याला मारहाण देखील केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वृद्ध होरपळून गंभीर जखमी
दरम्यान, आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचवल्याने त्या 75 वर्षीय वृद्ध लक्ष्मण हे होरपळून गेले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला फोड होऊन गंभीर भाजले, तसेच पाठीवर देखील भाजल्याने अंगाची कातडी जळाली आहे.
या बाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलीस स्टेशन गाठले. या संर्दभात मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्याशी संपर्क साधला. सध्या मी बाहेर असून पोलीस ठाण्यात गेल्यावर आपणास अधिक माहिती कॉल करून देण्यात येईल, असे बोलून अधिक बोलणे टाळले. त्यामुळे राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र काही वेळाने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला.
ही बातमी वाचा :