Mumbra Shivsena : मुंब्रा शिवसेना शाखेचा वाद चिघळला, दिवाळीत राजकीय फटाके फुटण्याची शक्यता
Thane Shivsena : ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शाखा ही शिंदे गटाने घेतली आणि जुनी शाखा जमीनदोस्त करून त्या ठिकाणी तात्पुरती कंटेनर शाखा उभारली आहे.
ठाणे : मुंब्रा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचा (Mumbra Shivsena Office) वाद आता वाढत चालला आहे. आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.
शिंदे गटाने जमीनदोस्त केलेल्या शाखेला आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 11 नोव्हेंबर रोजी मुंब्र्यात येणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीर करत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे - ठाकरे गटात ऐन दिवाळीत राजकीय 'आतषबाजी' होण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती शाखा तोडल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा सुरू केली आहे. नवीन शाखेचे काम देखील सुरुवात करण्यात आली आहे. शिंदे गटातील स्थानिक पदाधिकारी राजन केणी हे आपल्या कार्यकर्त्यांसह या शाखेत बसत असून त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देखील दिले आहे. तसेच त्यादिवशी उद्धव ठाकरे येथील त्या दिवशी आम्हाला काही हरकत नसून आम्ही देखील या ठिकाणी शांततेत उपस्थित राहू असे ते म्हणाले.
मागील वेळेस रोशनी शिंदे प्रकरणाच्या वेळी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा शाखेच्या वादामुळे उद्धव ठाकरे ठाण्यात येत आहेत. याच वेळी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय आतषबाजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच शाखेचा आढावा घेतला आहे
शिंदे गटाने शाखा ताब्यात घेतली
मुंब्र्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढले. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केला.
आनंद दिघे यांच्या काळात ही शाखा रस्ता रुंदीकरण झाल्याने या ठिकाणी आमच्या सहकार्याने बनवली होती. मात्र आता याची दुरवस्था झालेली आम्हाला बघवली नाही. वर्षातून काहीच दिवस शाखा उघडण्यात येत होती. त्यामुळे ही शाखा धूळ खात पडली होती. मात्र शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी घोषित झाल्याने आम्ही आमच्या हक्काच्या शाखेत प्रवेश केला असल्याचं शिंदे गटाचे राजन किणे यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा: