Thane : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा उमेदवार, सेनेला धक्का देत संजीव नाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित
भाजपचा वैचारिक पाया घडवणारे रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी ठाण्याचे प्रतिनिधित्व केलं होतं.त्यामुळेच हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपचा आग्रह होता.
ठाणे: राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून भाजपने 32 जागांवर दावा (Maharashtra BJP Candidate List) केला आहे. या 32 जागांवर भाजपचे उमेदवारही तयार असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या काही जागांचा समावेश आहे. त्यामधून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) ठाण्याच्या जागेवरही भाजपने दावा केल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप डॉ. संजीव नाईक (Sanjeev Naik) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.
भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये ठाण्यातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं दिसतंय. ठाण्याची जागा सध्या शिवसेनेकडे आहे. या ठिकाणचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळेच ही जागा आपल्याला मिळावी यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे.
जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिंदे गटाचा प्रयत्न
भाजपने उमेदवार निश्चित केला असला तरी ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
सध्या शिवसेनेचा गड असलेला हा मतदारसंघ 1991 च्या निवडणुकपर्यंत भाजपकडे होता. त्यानंतर आनंद दिघे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला. तेव्हापासून, एक अपवाद वगळता, हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ होता. भाजपाची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असे खासदार निवडून आणलेला भाजपच्या वैभवशाली परंपरेचा वारसा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे.त्यामुळेच भाजपचा वैचारिक पाया रचणाऱ्या नेत्यांना घडवणारा मतदारसंघ हा आपल्याकडे असावा अशी इच्छा भाजपची आहे.
ठाणे मतदारसंघाचा इतिहास -
1977 - रामभाऊ म्हाळगी (जनसंघ )
व्होट शेअर - 59 टक्के
1980 - रामभाऊ म्हाळगी (जनसंघ )
व्होट शेअर - 39 टक्के
1984 - शांताराम घोलप (काँग्रेस)
व्होट शेअर - 58.73 टक्के
1989 - राम कापसे (भाजप )
व्होट शेअर - 53.57 टक्के
1991 - राम कापसे (भाजप)
व्होट शेअर - 47.24 टक्के
1996 साली युतीच्या जागावाटपात बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागून घेतला. तोपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे होता. त्यानंतर 1996 ते 2009 या काळात शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे खासदार होते.
2009 - गणेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस
2014-2024 - राजन विचारे, शिवसेना
ही बातमी वाचा: