BJP : महाविकास आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी भीती: चंद्रशेखर बावनकुळे
Thane BJP : नरेंद्र मोदी पुन्हा यावे, ही भाजपची गरज नसून जनतेची गरज असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं.
ठाणे : राज्यातील लोकसभेच्या सर्वच जागा महायुती जिंकणार असून महायुतीला त्यांची एकही जागा निवडून आणता येणार नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. त्यांचा एकही खासदार निवडून येणार नसल्याची भीती महाविकास आघाडीला आहे असंही ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजितदादा गेल्यामुळे त्यांना आता भीती वाटायला लागली आहे आणि त्यांचे एकही खासदार निवडून येणार नाही. जे काही निवडून येतील ते महायुतीचे खासदार निवडून येणार आहेत आणि बारामती मध्ये देखील प्रचंड मतांनी महायुती निवडून येणार आहे. म्हणून त्यांना भीती वाटत आहे.
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघनिहाय महाविजय 2024 संकल्प दौरा कार्यक्रम राबविला जात आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात व जल्लोषात स्वागत केला.
या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आली. त्यानंतर कोपर , पूर्णा येथेही बावनकुळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनतर शहरातील पद्मानगर भाजी मार्केट येथील भाजी व फळ विक्रेते,किराणा दुकानदार, उज्वला गॅस योजना, नाका कामगार, आयुष्यमान भारत, स्वनिधी लाभार्थी, मोफत धान्य मिळणारे लाभार्थी यांच्याशी संवाद साधत त्यांना 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण हवेत अशी विचारणा बावनकुळे यांनी केली. या संवाद यात्रेत केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले सहभागी झाले होते.
या संवाद यात्रेचा समारोप करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंडिया आघाडीवर टिका केली. ते म्हणाले की, मुंबई येथे 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सभेवर देखील टिका करत राज्यात मोदी यांच्या नेतृत्वाला भरघोस प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये भिवंडी लोकसभे मधील संवाद यात्रा ही 23 वी आहे असे सांगत भिवंडीत 814 तर राज्यात तब्बल 35 हजार नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये फक्त 13 जणांनी मोदी व्यतिरिक्त इतर व्यक्तीचे नाव घेतले अशी माहिती दिली.
काँग्रेसच्या 65 वर्षांचे पाप मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धुवून काढले असे सांगत देशाला विश्वात महसत्ता बनविण्यासाठी 2024 मध्ये महाराष्ट्रात 45 प्लस खासदार निवडून देण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी केले.तर या प्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिर दर्शनासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील 50 हजार नागरिकांना घेवून जाण्याचा संकल्प बोलून दाखविला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिष्ठा उंचावली असून, सर्वच स्तरांमधून नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा यावेत, ही भाजपाची गरज नसून जनतेची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा जनतेला लाभ होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
ही बातमी वाचा: