ठाण्यातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, शेकडो लीटर दारु जप्त
Thane News : राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी 22 जुलै रोजी राबविलेल्या धाडसत्र मोहिमेमध्ये स्वतः सहभाग घेतला
Thane News : ठाणे जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांनी आपल्या पथकासोबत धाड टाकली. यामध्ये 600 लीटर हातभट्टीची दारु जप्त केली. धडक कारवाईवेळी त्यांनी 24 गुन्हे नोंदवले आहेत. नोंदविलेल्या सर्व बेवारस गुन्हयातील आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत व आय.पी.सी. कलम ३२८ अन्वये तसेच एम.पी.डी.ए. कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिल्या.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी 22 जुलै रोजी राबविलेल्या धाडसत्र मोहिमेमध्ये स्वतः सहभाग घेतला. त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली पथके तयार करुन ठाणे जिल्ह्यातील मौजे अलिमघर, दिवा, घेसर, खरडर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गांव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापुर, कुंभारली व रायगड जिल्हयामधील काही गांवामधील हातभट्टी दारू निर्मीती केंद्रांवर धाडी टाकून उद्ध्वस्त केली.
या कारवाईमध्ये १ वारस व २३ बेवारस असे एकुण २४ गुन्हे नोंदविले आहे. यामध्ये ५९५ लिटर हातभट्टी दारु, ६९ हजार २०० लिटर रसायन व इतर भट्टी साहित्य असा एकुण २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. सदर मोहिमेमध्ये उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी कोकण विभागाचे उप आयुक्त व ठाणे जिल्ह्याचे अधिक्षक यांच्या समवेत स्वतः तीन बोटी मधून मौजे अलिमघर, दिवा, अंजुर खाडीतील हातभट्टी दारू निर्मीती ठिकाणे उध्वस्त केली. तसेच रायगड जिल्हयातील पथकानेसुध्दा एकूण ८ गुन्हे नोंदवून एकुण ४ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. सदर कारवाई मध्ये १३० अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
सदर नोंदविलेल्या सर्व बेवारस गुन्हयातील आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत व आय.पी.सी. कलम ३२८ अन्वये तसेच एम.पी.डी.ए. कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिल्या. या कारवाईमध्ये विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक डॉ.निलेश सांगडे, उपअधीक्षक वैभव वैद्य, डोंबिवली, मुंबई उपनगर, मुंबई शहर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर विभागाचे निरीक्षक, कर्मचारी तसेच त्यांच्या भरारी पथकांचा समावेश होता.