Najeeb Mulla : मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
Thane Mahapalika Election : ठाणे शहरात जर राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा, शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं.

ठाणे : एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आमचे दुश्मन नाहीत, आम्हाला जर कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आणि त्यावर विचार करू असं मोठं वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी केलं. तर त्याला पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
ठाण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?
जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले.
ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली. मात्र जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही.
Thane NCP News : पवारांच्या राष्ट्रवादीचा सकारात्मक प्रतिसाद
अजित पवार गटाच्या प्रस्तावावर शरद पवार गटाचे देखील सकारात्मक उत्तर आलं आहे. शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा देखील राष्ट्रवादीच्या युतीला होकार आहे. मनोज प्रधान म्हणाले की, "त्यांची भावना चांगली आहे. इतकी वर्षे आम्ही आव्हाड यांच्या नेतृत्वात काम केले आहे. प्रस्ताव कोण देणार यापेक्षा भावना महत्वाची आहे. त्यांच्या कडून सकारात्मक भावना आली आहे. जर आव्हाड आणि अजित पवार यांनी चर्चा केली तर नक्कीच काहीतरी होऊ शकेल."
प्रश्न आहे की इलेक्शन आधी एकत्र यायचे की नंतर एकत्र यायचे? आधी जर एकत्र आलो तर नक्कीच कळवा-मुंब्रा प्रमाणे ठाणे शहरात देखील राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असं मनोज प्रधान यांनी स्पष्ट केलं.
Thane Election : ठाण्यात मविआ-मनसे एकत्र
ठाणे महापालिकेसाठी मविआ आणि मनसेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. माजी खासदार राजन विचारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात बैठक झाली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
Maharashtra Election News : ठाण्यात काँग्रेसला धक्का
निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडलं आहे. ठाण्य़ातील काँग्रेसच्या सेवादलचे पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेखर पाटील, संजीव शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील वर्तक नगर येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
ही बातमी वाचा:
























