Mira Road: मिरा रोडमध्ये नालेसफाईचा बोजवारा, शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा नाला तुंबला
Mira Road Drainage: मिरा भाईंदर शहराला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या नाल्यावर नागरिकांचा विरोध असताना सेल्फी पॉईंट बनवला. आता हा सेल्फी पॉईट चरीस गर्दुल्यांचा अड्डा बनत चालल्याचं चित्र आहे.
ठाणे: मिरा भाईंदर महानगरपालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी, मिरा भाईंदर शहराला पूर्व पश्चिम जोडणारा नाला तुंबल्याचे दृश्य दिसत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरीकांनी नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याचा आरोप केला आहे.
मिरा रोडच्या नया नगर येथील बॅक रोड जवळ रेल्वे लाईनच्या समांतर मुख्य नाला गेला आहे. त्या नाल्यावर सुशोभिकरणाच्या नावाखाली पालिकेने सेल्फीपॉईंट बनवलं आहे. त्या सेल्फिपॉईंटच्या खाली रेल्वे लाईनच्या खालून, पूर्व-पश्चिमेला जोडणारा नाला आहे. पावसाला सुरु झाला असला तरी अद्यापही हा नाला साफ केला नसल्याच दिसून येत आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने मिरा भाईंदर मध्ये पावसाचे पाणी साचण्याची भिती नागरीकांनी व्यक्त केली आहे.
मुख्य नाल्यावर बांधण्यात आलेल्या या सेल्फी पॉंईटला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. आता हा सेल्फी पॉईट चरीस गर्दुल्यांचा अड्डा बनत चालला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हा सेल्फी पॉईट बंद आहे. येथील नाला साफ करण्याच्या नावाखाली सेल्फी पॉंईट बंद करुन नाल्यावरील झाकणे काढली आहेत.
भिवंडीत नाल्यात उतरून भ्रष्टाचार दाखवण्याचा प्रयत्न
भिवंडीच्या निजामपूर शहर महानगर पालिकेअंतर्गत नाले आणि गटार सफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र तरीही, दरवर्षी भिवंडीत जलमय परिस्थिती पाहायला मिळते आणि याला जबाबदार नाला आणि गटरसफाईत होणारे भ्रष्टाचार असल्याचा आरोप समाजसेवक परशुराम पाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महानगर पालिकेला अर्ज देखील केला, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे समाजसेवक परशुराम पाल यांनी प्रत्यक्षात भ्रष्टाचार कशाप्रकारे होत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. थेट गटार आणि नाल्यामध्ये उतरून त्यातील गाळ बाहेर काढत त्यांनी पालिकेला समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजसेवक परशुराम पाल यांच्या मते गटार आणि नालेसफाई करताना दोन चेंबरमधील अंतर तब्बल पाच मीटर असून, फक्त चेंबरखाली असलेला गाळ पालिकेच्या ठेकेदारांकडून काढण्यात येतो आणि उर्वरित गाळ गटारातून काढलाच जात नाही. ठेकेदारांकडून नाले आणि गटार सफाई करत असल्याचा नाम मात्र देखावा केला जातो, पण प्रत्यक्षात हवी तशी नाला आणि गटर सफाई केली जात नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप पाल यांनी केला आहे.
ही बातमी वाचा: