Jitendra Awhad : महेश आहेर हल्ला प्रकरण, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
Jitendra Awhad : ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jitendra Awhad : ठाण्याचे (Thane) अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant municipal commissioner Mahesh Aher) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसांनी (Naupada Police) हा गुन्हा दाखल केला आहे. भादंवी कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब), या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे.
काल सायंकाळी महेश आहेर यांच्यावर हल्ला
बुधवारी (15 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केल्याची घटना घडली. महेश आहेर यांना तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत.
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदूक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.
ऑडिओ क्लिप व्हायरल
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
काय म्हटलंय त्या ऑडिओ क्लिपमध्ये?
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा हा आवाज असल्याचा आरोप आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी, पैसे मोजणारा व्यक्ती त्यांचा जमा-खर्च सांभाळणारा; जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला व्हिडीओ