Ambernath Landslide : अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, दोन घरं खचली, रहिवाशांना शिवसेनेकडून तात्पुरता निवारा
ठाणे (Thane) जिल्ह्यातील अंबरनाथमध्येही (Ambernath) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अंबरनाथमध्ये भूस्खलन (Landslide) झालं आहे.
Ambernath Landslide : राज्यात विविध ठिकाणी पाऊस (Rain) पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तसेच या पावसामुळं शेतीचंही याठिकाणी नुकसान झालं आहे. दरम्यान, ठाणे (Thane) जिल्ह्यातील अंबरनाथमध्येही (Ambernath) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अंबरनाथमध्ये भूस्खलन (Landslide) झालं आहे. आंबेडकर नगर टेकडीवरील दोन घरं खचली असून, रहिवाशांना शिवसेनेकडून तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही मदत केलेली नाही.
अंबरनाथच्या पूर्व भागात आंबेडकर नगरमध्ये टेकडीवर काही घरं आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं या टेकडीची माती भुसभुशीत होऊन भूस्खलन झालं आहे. त्यामुळं टेकडीवरील मोहन बंडगर यांच्या घराची भिंत कोसळली आहे. त्यामुळं हे घरं राहण्यासाठी धोकादायक बनली आहेत. तर शेजारी राहणाऱ्या महाळू रणदिवे यांच्या घराच्या भिंतीला देखील तडे गेले आहेत. त्यामुळं बंडगर कुटुंबातील चार सदस्यांचं छत हिरावलं आहे. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, स्थानिक शिवसैनिक अजय मोहोरीकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.
महापालिकेनं नवीन घर बांधून द्यावं, नुकसानग्रस्तांची मागणी
अजय मोहोरीकर यांनी बंडगर कुटुंबियांना तात्पुरता निवारा म्हणून तातडीने एक घर आणि खाण्यापिण्याच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर अंबरनाथ पालिकेकडून या घराची पाहणी करण्यात आली आहे. पालिकेकडून बंडगर यांच्या घराचा धोकादायक बनलेला भाग निष्कासित केला जाणार आहे. त्यामुळं आता पालिकेनं आम्हाला नवीन घर बांधून द्यावं, अशी मागणी देखील बंडगर कुटुंबीयांनी केली आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावासाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. पनवेलमधील वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनावेळी जोराचा पाऊस सुरु होती. यावेळी जनरेटरची एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली. यावेळी त्याला शॉक लागला. त्याला पाहून कुटुंबीयांनी मदत करण्यासाठी त्याला स्पर्श केला. या वेळी कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : आज महाराष्ट्रात पावसाचा 'यलो अलर्ट', नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
- जायकवाडी धरणातून 56 हजार क्यूसेकने विसर्ग; गणेश भक्तांनी नदीपात्रात उतरू नयेत, पोलिसांचे आवाहन