सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्यांचा डोंबिवलीत सत्कार; घराचा पत्ता शोधण्यासाठी सोशल मीडिया वापरल्याची माहिती
Gunaratna Sadavarte Car Vandalizedtion : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना अटक करण्यात आलेली, पण तिघांचीही जामीनावर सुटका करण्यात आलीये.
Maratha Kranti Morcha on Gunaratna Sadavarte Car Vandalizedtion : डोंबिवली : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) कार्यकर्त्यांकडून 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी करत तोडफोड करण्यात आलेली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केलेली. आता या कार्यकर्त्यांची न्यायालयानं 5 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी-शर्थींसह सुटका करण्यात आली आहे. तीन आरोपींची जामीनावर सुटका झाल्यानंतर डोंबिवलीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तिघांचा भव्य सत्कार केला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांनी गाडीची तोडफोड प्रकरणासंदर्भात माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी जरांगे पाटील हेच दोषी आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मंगेश साबळे हे सरपंच असून त्यांनी अनेक वेगवेगळी आंदोलनं गेवराई तालुक्यामध्ये केली आहेत. कधी पैशांची उधळण, तर कधी स्वतःची गाडी जाळण्याचा प्रयत्न अशा आंदोलनांमुळे मंगेश साबळे हे महाराष्ट्रात चर्चेमध्ये आहेत आणि आज सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे पुन्हा एकदा साबळे चर्चेत आले आहेत.
साबळे यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हे बॅकवर्ड कास्ट मधले आहेत, ते देखील मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी या आंदोलनामध्ये सामील झाले आहेत, सदावर्ते यांच्या घराचा पत्ता त्यांच्या गाड्यांची माहिती या कार्यकर्त्यांनी युट्युब, फेसबुक अशा सोशल मीडियावर सर्च केली आणि थेट सदावर्ते यांचं परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असलेलं घर गाठून इमारतीसमोर उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केल्याचं, मंगेश साबळे, वसंत बनसोड, राजू साठे यांनी बोलताना सांगितलं.
नेमकं काय घडलं?
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.