Ghodbunder Road: घोडबंदर घाट रस्ता दोन आठवडे बंद राहणार; मार्गावरील अवजड वाहनांसाठी वाहतूकीत बदल
Ghodbunder Ghat Road: मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते.
ठाणे: घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. आज (24 मे) शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. हलक्या वाहनांना मुभा असेल, तर अवजड वाहनं अंजूर फाट्यामार्गे वळवण्यात येणार आहे. 6 जून पर्यंत ही प्रवेशबंदी असणार आहे. (Ghodbunder Ghat Road will remain closed for two weeks)
मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र आता घोडबंदर घाट रस्ता दोन आठवडे बंद राहणार असल्याचने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.
घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती केली जाणार आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. मात्र आजही शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरुच आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या दाव्यानूसार दोन टप्प्यात हाती घेतलेल्या 284 रस्त्यांची कामे 98 टक्के झाली आहेत. प्रत्यक्षात आजही घोडबंदर भागासह इतर भादात रस्त्यांची कामे सुरुच आहेत.
24 मे ते 6 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी मार्गात बदल- (Traffic changes for heavy vehicles on the road)
- मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवडाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे जातील.
- मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे वाहतुक करतील.
- नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून उजवीकडे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे जातील.
- गुजरात येथून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गे जातील.
संबंधित बातम्या:
मुंबईकरांनो पाणी जपुन वापरा; लोअर परेल, दादर, भांडुपमध्ये आज पाणी बंद!
Maharashtra Weather : कोकण, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, IMD चा अंदाज काय सांगतो?