Thane : कळवा रुग्णालयात एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; आव्हाडांचे प्रशासनावर ताशेरे
ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) अनागोंदी कारभाराचे पुन्हा एकदा समोर आला आहे.
Kalwa Hospital Thane : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आव्हाड यांना संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले.
मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर तुमच्या कानफाडात लगावली असती
ठाणे शहरातील गोरगरीब रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्णांचे आधारवड म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पहिले जात आहे. मात्र, याच रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहराला स्मार्ट सिटी करत असताना, शहर भर कोट्यवधी रुपये खर्च करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे याच ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र दिसून येत आहे. मल्टिस्पेशालिटी, टाटा कर्करोग रुग्णालयाची उभारणी करत असल्याच्या सांगण्यात येत आहे. असे असले तरी, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची उभारणी करणे गरजेचे असल्याचे मत देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांना संताप अनावर न झाल्याने कळवा रुग्णालयाचे डीन यांना शिवीगाळ करत कानफाडात लगावण्याची भाषा त्यांनी केली. मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर तुमच्या कानफाडात लगावली असती असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं.
रुग्णालयात आलेले रुग्ण गंभीर होते, रुग्णालय प्रशासनाचा खुलासा
दरम्यान, रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करुन घेण्याची क्षमता संपली असून, आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे तीन रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते असा खुलासा प्रशासनाने केला आहे. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय वैद्यकीय अधिकार डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. यामध्ये एका रुग्णाचा हृद्यविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एका अज्ञात, आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचे मृत्यू झाला असल्याची माहिती देखील माळगावकर यांनी दिली.
नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश
वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. मोबाईल चार्जिंगचे शंभर, आयसीयू बेडचे 200 तर ऑक्सिजन बेडचे 200 रुपये मागितले जात असल्याचा गंभीर आरोप देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालय परिसरातपोलिसांचा मोठा बंदोबस्त
या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील प्रकरणाचा आढावा घेत रुग्णालय प्रशासनातला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं हे प्रकरण आज चिघळण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाला मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तसेच दंगल नियंत्रण पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेल आहे.
महत्त्वाच्या बातम्या: