Badlapur VIDEO : लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Badlapur School Sexual Assault Case : बाहेरून आलेले आंदोलक यावेळी मुख्यमंत्री लाडकी योजनेचे बोर्ड घेऊन आले होते, हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुंबई : बदलापूरमध्ये आठ ते नऊ तास चाललेले आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. असे चिमुकलीवर आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या जिव्हारी लागली आहे, या योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली. या प्रकरणी पोलिस तपास करत असून कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असंही ते म्हणाले.
बदलापूर केस फास्ट ट्रॅकवर घेणार
बदलापूरमध्ये झालेल्या योजनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूरमध्ये झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींनी कठोर शिक्षा देण्यासाठी कारवाई करावी असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात येईल, त्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या परिवाराच्या मागे शासन असून सर्व सहकार्य करण्यात येईल.
भविष्यामध्ये अशा काही दुर्घटना होऊ नयेत यासाठी पावलं उचलली जाणार आहे. त्यासंबंधी संस्थाचालकांनाही काही निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बदलापूरचे आंदोलन राजकारणाने प्रेरित
बदलापूरमध्ये सात ते आठ तास झालेलं आंदोलन हे राजकारणाने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, कालच्या आंदोलनामुळे दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. परंतु कालचं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं. इतक्या जलदगतीने गाड्या भरून बाहेरून लोक आले. आंदोलकांना मंत्र्यांनी समजावलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही ते माघार घेत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. लहान मुलीचे राजकारण करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे.
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ विरोधकांना उठला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, या राज्यातल्या बहिणींनी सुरक्षा देण्याचं काम हे राज्य सरकार करणार. कुणालाही पाठिशी घालणार नाही. विरोधकांना सांगणं आहे की यावरून राजकारण करू नका. लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली असल्याचं हे कालच्या आंदोलनातून स्पष्ट झालंय.
ही बातमी वाचा: