विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका; कोविड रुग्णाला तीन लाख 43 हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश
ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने तीन लाख 43 हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश देत, विमा कंपनीला दणका देणारा निकाल दिला आहे.
ठाणे : कोरोना काळात हेल्थ इन्शुरन्स असूनही एका रुग्णाला बिलाची रक्कम मिळाली नव्हती. या गोष्टीची दखल ग्राहक न्यायालयाने घेत विमा कंपनीला चांगलाच दणका दिला आहे. त्या व्यक्तीला तीन लाख 43 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश कंपनीला दिला आहे.
2020 साली कोविड रुग्णाला कल्याणातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाकडे विमा कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्स असून त्याला रुग्णालयातील बिलाची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे त्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर वेळोवेळी सुनावणी होऊन विमा कंपनीसह थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटरला ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने तीन लाख 43 हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश देत, विमा कंपनीला दणका देणारा निकाल दिला आहे.
दोन वर्षापूर्वी कोविडचा उद्रेक झाला होता. त्या उद्रेकमध्ये कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार भागातील सुफाला सोसायटीत राहणारे जयेश द्वारकादास राजा यांनाही कोविड आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर कल्याण पश्चिम भागातील रिद्दी हॉस्पटिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी 1 जुलै ते 12 जुलै 2020 पर्यत ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या उपचाराचे एकूण बिल 4 लाख 47 हजार 771 रुपये झाले होते. त्यानंतर विमा कंपनीने त्यांना केवळ 1 लाख 34 हजार रुपये मंजूर केले होते. त्यावर राजा यांनी आक्षेप घेत ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे विमा कंपनी विरोधात दावा दाखल केला. या दाव्यावर 6 एप्रिल 2022 रोजी अंतिम सुनावणी झाली.
या दरम्यान राजा यांनी हॉस्पिटलच्या 3 लाख 13 लाख 771 दाव्याची शिल्लक रक्कम आणि त्याच्या मानसिक छळाची आणि खटल्याच्या खर्चाची नुकसान भरपाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी ग्राहक मंचाकडे केली. विशेष म्हणजे राजा यांची फेब्रुवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीसाठी मेडिक्लेम विमा पॉलिसी मिळवली होती. त्यांच्या विम्याची रक्कम 5 लाख 25 हजार रुपये असल्याचे पुरावे त्यांनी ग्राहक न्यायालयात दिले. त्यानंतर ग्राहक मंचाकडून विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली असली तरी विमा कंपनी बचाव रेकॉर्डवर ठेवण्यास आणि दाव्याच्या रकमेसाठी केवळ 1 लाख 34 हजार रुपयांची रक्कम का मंजूर करण्यात आली हे सिद्ध करण्यात विमा कंपनीवाले अपयशी ठरले.
वास्तविक पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख 25 हजार रुपये असल्याने, तक्रारदार राजा यांना एकूण दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार होता. शिवाय तक्रारदाराने असेही सादर केले आहे की पॉलिसीसह, त्याला कोणत्याही अटी आणि शर्ती प्रदान केल्या नाहीत, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे, ग्राहक मंचाने दोन्ही विमा कंपनींना 3 लाख 13 हजार 771 रुपये शिल्लक दाव्याची रक्कम तसेच वार्षिक 10 टक्के व्याजासह रक्कम वसूल होईपर्यंत देण्याचे निर्देश दिले. तसेच विमा कंपन्यांनी तक्रारदार राजा यांना मानसिक त्रास व छळासाठी 20 हजार आणि कार्यवाहीच्या खर्चापोटी 10 हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी आणि सदस्य पूनम व्ही महर्षी यांनी दिले आहे.