Thane : 'शासन आपल्या दारी'वर कोट्यवधी उधळण्यापेक्षा मूलभूत सुविधा द्या; शहापूरच्या घटनेवरून बाळासाहेब थोरातांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Balasaheb Thorat : शहापूर तालुक्यात रस्त्यांची सोय नसल्याने झोळीतून नेताना एका महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना घडली होती, त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी राज्य सरकारवर टीका केली.
ठाणे : पुरेशा सोयी आणि रस्त्याअभावी वाटेतच महिलेची प्रसुती होणं आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही गोष्ट दुर्दैवी असल्याचं सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाण्यामध्ये एका ठिकाणी आले असताना त्यांनी शहापूरमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केलं. जनतेच्या पैशातून शासन आपल्या दारी कार्यक्रम (Shasan Aplya Dari) राबवण्यापेक्षा जनतेला सुविधा देणे गरजेचे असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात रस्ते सुविधा नसताना पटकीचा पाडा येथील गरोदर आदिवासी महिलेला रस्तांच्या अभावी कापडाच्या झोळीमधून नेलं जात होतं. त्यावेळी तिची रस्त्यातच प्रसुती झाली. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यात आरोग्य आणि रस्ते सुविधांची असलेली दुरवस्था ही चिंताजनक आहे. जनतेचे हाल सुरू आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा जनतेला घरबसल्या दाखले वितरित केले असते आणि तोच वाचलेला पैसा नागरिकांना सुविधा देण्याकरता खर्च केला असता तर ही वेळ आली नसती. प्राधान्याने ज्या गोष्टींवर खर्च व्हायला हवा ते न करता अनावश्यक गोष्टींवर सरकार खर्च करत आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जनतेच्या पैशातून सहा ते सात कोटी खर्च करताना अत्यावश्यक गोष्टींकडे सरकार दुर्लक्ष करते हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे.
महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी जाताना अडवणे दुर्दैवी
मुंबईतील इंडिया आघाडीच्या आंदोलनावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविणे हे दुर्दैवी आहे. ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली, सत्याग्रह आणि असहकाराचा मार्ग दाखवला त्यांना अभिवादन करायला जायचं नाही? जी वृत्ती इंग्रजांची होती तीच वृत्ती भाजपा सरकारची आहे. नथुरामाचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरू आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे. या गोष्टीचे संपूर्ण जग निषेध करेल.
केंद्रीय मंत्र्यांच्या हातात काहीच नाही
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेलाही बाळासाहेब थोरातांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, आताच्या सरकारमध्ये राज्यमंत्री नव्हे तर केंद्रीय मंत्र्याच्यासुद्धा हातामध्ये काहीच नाही हे खरे आहे. मंत्र्यांच्या हातात काही नाही तर राज्यमंत्र्यांच्या हातात काय असणार? जे काही काम चालत ते पंतप्रधान कार्यालयातून चालत. शून्य किंमत या केंद्रीय मंत्रिमंडळाला आहे ही वस्तुस्थिती आहे ही सर्व जनतेला माहित आहे.
भिवंडी ग्रामीण भागात काँग्रेस वाढत असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हाडाचा कार्यकर्ता असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. दयानंद चोरघे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. लोकांमध्ये वावरणारा आणि त्यांची कामं करणारा, समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रात काँगेसबद्दल लोकप्रियता वाढत आहे असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा: