Bhiwandi News : देव तारी त्याला कोण मारी... भिवंडीत सहाव्या मजल्यावरुन पडलेला बालक सुदैवाने बचावला
देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय भिवंडी शहरात आला. शहरातील रोशन बाग परिसरातील सात मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून देखील 12 वर्षीय मुलगा बचावला आहे.

Bhiwandi News : देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय भिवंडी (Bhiwandi) शहरात आला. शहरातील रोशन बाग परिसरातील सात मजली इमारतीच्या (Building) सहाव्या मजल्यावरुन पडून देखील 12 वर्षीय मुलगा बचावला आहे. दैव बलवत्तर म्हणूनच एवढ्या उंचावरुन पडूनही सुदैवाने तो बचावला आहे. इर्शाद अहमद खान (वय 12 वर्ष) असं दुर्घटनेतून बचावलेल्या या बालकाचं नाव आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर पडल्याने तो जखमी झाला आहे.
धावताना तोल जाऊन थेट खाली असलेल्या रिक्षावर पडला
भिवंडी शहरातील रोशन बाग येथील गोल्डन हॉटेलजवळ जीलानी कॉम्प्लेक्स या सात मजली इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील बांधकाम अर्धवट असून त्याला गॅलरी सुद्धा बांधलेली नव्हती. दरम्यान या इमारतीमध्ये राहणारी सर्व मुलं सहाव्या मजल्यावर खेळायला जात असत. त्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या फ्लॅटमध्ये ही मुलं कधी लपाछपी तर कधी चोर पोलीस खेळायची. नेहमीप्रमाणे खेळायला जातो असं सांगून इर्शाद अहमद खान हा घरातून बाहेर पडला. इमारतीच्या मुलांसोबत लपाछपी खेळत या सहाव्या मजल्यावर आला होता. इर्शाद एका फ्लॅटमध्ये लपला होता त्यावेळी धावताना त्याचा तोल जाऊन तो थेट खाली उभ्या असलेल्या रिक्षावर पडला.
इर्शादवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु
इमारतीखाली जोरात आवाज आल्याने नागरिकांनी धाव घेतली. इथे पाहिलं असा इर्शाद रिक्षावर आदळल्याने रक्तबंबाळ झाला होता. या दुर्घटनेत इर्शाद याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत परिसरात एकच अफवा उडली की सहाव्या मजल्यावरुन पडलेल्या मुलाची दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली. या बातमीची चाहूल भोईवाडा पोलिसांना लागताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालय गाठलं तेव्हा समजलं की इमारतीवरुन पडलेल्या इर्शादचा मृत्यू झाला नसून तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून देखील इर्शाद सुदैवाने बचावला आहे. शहरातील अलराजी या खासगी रुग्णालयात इर्शादवर उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या संपूर्ण घटनेची भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.
हेही वाचा
Bhiwandi News: भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; एका मुलाचा दबून मृत्यू, एक जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
