Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृतदेह आमच्या हद्दीत दफन नको, अंबरनाथ नगरपालिकेची भूमिका
Badlapur Akshay Shinde Encounter : परगावातील व्यक्तीचा मृतदेह अंबरनाथ शहरात दफन करण्यास परवानगी देत नाही असं अंबरनाथ पालिकेने म्हटलं आहे.
ठाणे : नुकतंच एन्काऊंटर झालेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अंबरनाथमध्ये दफन करण्यास पालिकेने परवानगी नाकारली आहे. परगावातील मृतदेह अंबरनाथ शहरात दफन करण्याची परवानगी आपण देत नसल्याची मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी म्हटलंय. अंबरनाथ शहरात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास राजकीय पक्षांचाही विरोध आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने अंबरनाथ पालिकेकडून परवानगी नाकारली आहे.
मनसेचा विरोध
अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराचा इतिहास आहे. अक्षय शिंदे हा नीच माणूस, तो कुणी साधू महात्मा नव्हे. त्यामुळे अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथमध्ये होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाला आहे. त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होण्यासाठी बदलापूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अंतिम संस्कार होण्यासाठी आमची काही हरकत नाही, मात्र ज्या ठिकाणी तो राहत आहे त्या खरवई या गावांमध्ये त्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे. जी घटना घडली त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे ,त्यामुळे बदलापूरकरांनी अंत्यविधीसाठी विरोध करू नये असं मत काही नागरिकांनी व्यक्त केलं. अंत्यविधी हा मांजर्लीमध्ये होऊ नये, तो खरवई गावांमध्ये करण्यात यावा असं मत काहींनी मांडलं.
राजकीय फायद्यासाठी अक्षयचा खात्मा, वडिलांचे पत्र
बदलापूर अत्याचार प्रकरणी एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलं आहे. अक्षयच्या कुटुंबाच्या जीवाला, तसंच कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तसंच किरीट सोमय्यांपेक्षा जास्त सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. अक्षयचा खात्मा राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप देखील या पत्रात करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: