Ambernath Ganpati : अंबरनाथमध्ये गणपतीच्या मोदकाचा तब्बल दीड लाखात लिलाव, बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा 14 वर्षीय मुलाला मान
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा तब्बल 1 लाख 52 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्र मंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केला.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा (Modak) तब्बल 1 लाख 52 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्र मंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केला.
खाटूश्याम मित्रमंडळाकडून अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पाजवळ ठेवला जातो. या मोदकाचा अनंत चतुर्दशीला लिलाव केला जातो. यावर्षी खास पाहुणे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी खाटूश्याम मित्रमंडळ गणपतीची मनोभावे आरती करुन दर्शन घेतले.
14 वर्षांच्या मुलाकडून मोदकाची खरेदी
गेल्या वर्षी या मोदकाचा लिलाव एक लाख एक हजार रुपयांना झाला होता. यंदा 30 हजार रुपयांनी या मोदकाची बोली सुरु झाली होती. तर मोदकाला तब्बल 1 लाख 52 हजारांची बोली लागली. 14 वर्षांच्या अर्णव चौबे याने हा दीड लाखांचा मोदक विकत घेतला. अर्णव चौबे हा एका व्यावसायिक परिवारातील असून लिलावात लावलेल्या मोदक घेऊन गणपती बापाचे आशीर्वाद मिळाल्याची भावना व्यक्त केली.
मोदकाचा लिलावाने विक्रम रचला
दरम्यान हा मोदक घेतल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते आणि काहीही कमी पडत नसल्याची अनुभूती येत असल्याची मान्यता आहे. यंदाच्या वर्षी मोदकाच्या लिलावाने दीड लाख रुपयांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचल्याचं खाटूश्याम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी सांगितलं.
मोदकाच्या रुपात देवाचा आशीर्वाद मिळाला : अर्णव चौबे
"मी मंडळात आल्यानंतर आज लिलाव होणार असल्याचं समजल्यानंतर मी ठरवलं की हा मोदक घेणारच. यंदा मला मोदक मिळाला. मला फार आनंद होतोय, देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. आशीर्वाद घेण्यासाठी मी मोदक घेतला. यात मला आईची साथ मिळाली. तिनेच मला सांगितलं की मोदकाचा लिलाव होत आहे," अशी प्रतिक्रिया अर्णव चौबे या मुलाने लिलावानंतर व्यक्त केली.
यंदा मोदकाचा 1 लाख 52 हजारात लिलाव
"तर मागील 30 वर्षांपासून खाटूश्याम मित्रमंडळाच्या गणपतीच्या हातात असलेल्या मोदकाचा शेवटच्या दिवशी लिलाव होता. मागील वर्षी या मोदकाचा एक लाख 11 हजार 111 रुपयात लिलाव झाला होता. यंदा हा मोदक 1 लाख 52 हजार रुपयात अर्णव चौबेने विकत घेतला आहे. या मोदकाचं महत्त्व म्हणजे सुख समृद्धी येते, असं समजलं जातं," अशी माहिती श्री खाटूश्याम मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी दिली.
हेही वाचा