(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई वडोदरा महामार्गावरील दुर्घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू
Mumbai Vadodara Highway : महामार्गाचे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने या दुर्घटनेस ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला.
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई - वडोदरा महामार्ग (Mumbai Vadodara Highway) सुरुवातीपासूनच विरोधकांच्या टीकेसह स्थानिक शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यासही विरोध दर्शवला होता. त्यामुळे हा मुंबई बडोदरा महामार्ग वादात सापडला असतानाच आज पुन्हा या महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. रघुनाथ पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक शेतकरी भिवंडी तालुक्यातील पुंडास गावात कुटूंबासह राहत होते. ते राहत असलेल्या या गावातूनच मुंबई - बडोदरा महामार्ग जात असल्याने या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यामध्ये बाधित होऊन सरकारच्या वतीने त्यांच्या जमिनी महामार्गाच्या कामासाठी मोबदला देऊन घेण्यात आल्या. विशेष म्हणजे मृत शेतकऱ्याचे घर जमीन या महामार्गाच्या प्रोजेक्टमध्ये बाधित झाली. मात्र मृतक रघुनाथ यांना गेल्या तीन वर्षांपासून त्यांना घर जमिनीचा मोबदला सरकार देऊ शकले नाही. मात्र त्याचा जीव ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेला असल्याचा आरोप मृत रघुनाथ यांच्या भावाने केला.
मृतक रघुनाथ हे नेहमीप्रमाणे पुंडास गावाच्या माळरानावर मेंढरं चरण्यासाठी घेऊन जात होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास मेंढराचे चरून झाल्यावर ते घराच्या दिशेने मेंढरानां घेऊन निघाले. मात्र मेंढर मुंबई बडोदरा महामार्गाचे सुरु असलेल्या कामासाठी ठिकाणी साठलेले पाणी दिसल्याने ते पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेले. तर दुसरीकडे मेंढरं अजूनपर्यत घरी आली नाही म्हणून रघुनाथ त्यांना शोधण्यासाठी गेले.
त्यावेळी त्यांना त्या महामार्गाच सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात मेंढरं दिसल्याने त्यांना घरी आणण्यासाठी त्या पाण्याजवळ जाताच त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे रघुनाथ बराच उशीर झाला तरी घरी आले नसल्याचे पाहून नातेवाईकांनी त्यांचा उशिरापर्यत शोध घेतला. मात्र ते सापडले नसल्याने आज सोमवारी पुन्हा त्यांचा शोध सुरू केला असता पाण्याची मशीनजवळ पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घाटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मात्र मृतक शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी मृतदेह त्या ठिकाणावरून हलविणास विरोध करत जोर्पयत मृतक शेतकऱ्याच्या महामार्गातील बाधित घर जमीनीचा मोबदला अधिकारी देत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृतकाच्या भावाने सांगितले. शिवाय त्यांनी आरोप केला की, महामार्गाचे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने य दुर्घटनेस ठेकेदार गंगामाई कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला.
दरम्यान पोलीसांच्या सहा तासांच्या मध्यस्थी नंतर लेखी आश्वासन दिल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे सध्या याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.