Bhiwandi Building Collapse : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू, एक गंभीर
Bhiwandi Building Collapse : भिवंडीच्या ग्रामीण पट्ट्यातील खाडीपार भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंड परिसरातील दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळला. यामुळे तळमजल्यावरील कापडाच्या दुकानात झोपलेल्या एकाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला.
Bhiwandi Building Collapse : भिवंडी (Bhiwandi) शहरालगतच्या ग्रामीण पट्ट्यातील खाडीपार भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंड परिसरातील दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळला. यामुळे तळमजल्यावरील कापडाच्या दुकानात झोपलेल्या एकाचा ढिगाऱ्याखाली (Debris) दबून जागीच मृत्यू झाला. आज (27 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असं मृतांचं नाव आहे. तर अशरफ नावाच्या 22 वर्षीय तरुणाला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपसारासाठी दाखल करण्यात आलं.
दुर्घटनाग्रस्त दोन मजली इमारत काटई ग्रामपंचायत हद्दीतील असून 30 ते 35 वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये व्यापारी गाळे आणि कार्यलय, गोदाम होती. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसंच टेक्स्टाईल कंपन्यांचे कार्यलय होतं. दरम्यान घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरु असून या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलं आहे का? याचा शोध ढिगारा हटवून घेत आहेत. विशेष म्हणजे ही घटना दिवसा घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.
4 वर्षात इमारती कोसळून 57 जणांचा मृत्यू
भिवंडी महापालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या 589 असून धोकादायक इमारतींची संख्या 400 एवढी आहे. धोकादायक इमारतींना नोटीस देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करत नसल्याने पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 25 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी देखील शहरात धोकादायक आणि अनधिकृत इमारती कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडी शहर आणि लगतच्या ग्रामीण पट्ट्यातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 25 हजार कुटुंब राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर गेल्या चार वर्षांत विविध ठिकाणी झालेल्या इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत 57 जणांचा मृत्यू झाला. तर 67 जण जखमी झाले आहेत.
धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
कामगारनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहर लगतच्या ग्रामीण पट्ट्यातील कामगार वर्ग मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आला असल्याने बांधकाम व्यवसायिकांनी शासकीय नियमांना तिलांजली देत छोट्या छोट्या जागेत वाटेल तशा मनमानी कारभार करीत इमारती बांधल्या आहेत. शासनाने दाखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याच्या निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून इमारतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
VIDEO : Bhiwandi Building Collapsed : भिवंडीच्या खाडीपार भागात कोसळली दोन मजली इमारत, एका व्यक्तीचा मृत्यू