Aadhaar Card : 'या' चुका टाळाच, UIDAI ने सांगितला आधारकार्डचा योग्य वापर
Aadhaar Card : आधारकार्ड ओळखपत्र म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन वापर केला जातो. पण आधारकार्डचा वापर करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Aadhaar Card : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आधारकार्ड ओळखपत्र म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन वापर केला जातो. पण आधारकार्डचा वापर करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक परिपत्रक जारी केले आहे, त्यामध्ये आधारकार्डचा वापर करताना काय करावे आणि काय काळजी घ्यावी.. याबाबतची माहिती सांगितली आहे.
प्रत्येक ठिकाणी Aadhaar चा वापर -
बँकमध्ये खाते उघडणं असो अथवा शाळेत-कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणं.... सिम कार्ड खरेदी करणं असे अथवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. आधारकार्ड आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण आधारकार्ड वापर करताना सावध राहणं गरजेचं आहे. तुमचा थोडासा निष्काळजीपणा त्रास, अडचणी वाढवणारा ठरु शकतो.
Aadhaar Card च्या वापरावरुन लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आधार कार्डचा वापर कसा आणि कुठे करावा...? यासारखे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्यामुळेच UIDAI नं लोकांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलाय. UIDAI नं परिपत्रक जारी करत आधारकार्डच्या वापराची माहिती दिली आहे.
आधार कुठे वापरले जाते?
आधार तुमची डिजिटल आयडेंटिटी आहे. तुम्ही ओळखपत्र म्हणून प्रत्येक ठिकाणी आधारकार्डचा वापर करु शकता. आधारक्रमांक शेअर करताना काळजी घ्या. ज्याप्रमाणे मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, UAN शेअर करताना जी खबरदारी घेणे आवश्यक आहे, तीच खबरदारी आधारकार्ड नंबर शेअर करताना घ्या..
ज्या ठिकाणी, ज्या कामासाठी तुम्ही आधारकार्ड शेअर करत आहात, तिथे तुमच्याकडून परवानगी मागितली जाते. आधारकार्डच्या कॉपीवर त्या कामाचा उल्लेखही केलेला असावा. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक शेअर करायचा नसेल, तर तुम्ही त्याऐवजी UIDAI द्वारे दिलेला व्हर्च्युअल आयडी (VID) वापरू शकता. व्हर्च्युअल आयडी जेनरेट करणं सोपं आहे आणि त्याला आधार नंबरच्या जागी वापरला जाऊ शकतो. लोक आधार कार्ड किंवा नंबर जिथे आवश्यक असेल तिथे देत असतात. अशा परिस्थितीत वेळोवेळी M-Aadhaar App अथवा UIDAI च्या संकेतस्थळावर ऑथेंटिकेशन हिस्ट्री वेळोवेळी चेक करत राहा.. येथे मागील सहा महिन्याची आधार हिस्ट्री दिसते.
आधार ईमेलसोबत लिंक करा.. कारण UIDAI ईमेलद्वारे आधार ऑथेंटिकेशनची माहिती देते. म्हणजे जेव्हा जेव्हा आधार ऑथेंटिकेट होईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून माहिती मिळत जाईल.
त्याशिवाय ओटीपी आधार ऑथेंटिकेशनचा वापर करा.. त्यासाठी आधारकार्डमध्ये नेहमी मोबाइल नंबर अपडेट ठेवा. यूआईडीएआय आधार लॉकिंग आणि बायोमेट्रिक लॉकिंग ची सुविधा देते. जर जास्त दिवस आधारचा वापर झाला नाही तर आधार बायोमेट्रिक्सला लॉक केलं जातं. जेव्हा याचा वापर करायचा असेल तर अनलॉक करा.. आधारचा चुकीचा वापर होत असल्याचं लक्षात आल्यास तुम्ही 24X7 तक्रार करु शकता. त्यासाठी UIDAI चा टोलफ्री नंबर 1947 आहे. याशिवाय तक्रार दाखल करण्यासाठी help@uidai.gov.in या मेलचा वापर करु शकता.
या चुका कधीच करु नका -
आधारकार्ड क्रमांक, पीव्हीसी कार्ड या आधारकार्डची प्रत कुठेही सोडू नका अथवा देऊ नका... त्याला सांभाळून ठेवा..
सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स टि्वटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर आधारकार्ड शेअर करु नका...
त्याशिवाय कोणत्याही अनऑथोराइज्ड व्यक्ती अथवा संस्थेला आधार ओटीपी कधीबी सांगू नका.
कोणत्याही व्यक्तीसोबत M-Aadhaar शेअर करु नका..
आधार म्हणजे काय?
आधार, या शब्दाचा अर्थ अनेक भारतीय भाषांमध्ये “पाया” असा आहे. युआयडीएआयद्वारे दिल्या जाणाऱ्या विशेष ओळख क्रमांकाला या नावाने ओळखले जाते. कुणाही रहिवाशाला नक्कल क्रमांक मिळू शकत नाही कारण तो त्यांच्या जैवसांख्यिकीशी जोडलेला असतो; म्हणूनच खोट्या व बनावट ओळखी शोधून काढल्या जातात ज्यामुळे सध्या सेवा वितरणात गळती होते. आधार - आधारित ओळख प्रमाणीकरणाद्वारे नक्कल व बनावट ओळख नष्ट केल्याने झालेल्या बचतीतून सरकार इतर पात्र रहिवाशांपर्यंत लाभ विस्तारित करू शकेल.