प्रजासत्ताक दिनी लॉन्च होणार FAU-G; आतापर्यंत 40 लाखांहून अधिक युजर्सचं प्री-रजिस्ट्रेशन
मेड इन इंडिया गेम FAU-G ला PUBG Mobile ला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. खास गोष्ट म्हणजे, हा गेम लॉन्च होण्यापूर्वी गूगल प्ले स्टोअरवर 40 लाखांहून अधिक युजर्सनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे.
लोकप्रिय मोबाईल गेम PUBG भारतात बॅन केल्यानंतर पब्जी प्रेमींमध्ये निराशा पसरली होती. परंतु, पब्जी सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं केली होती. तेव्हापासूनच तरुण या गेमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पूर्णपणे भारतीय असलेला FAU-G गेम प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, FAU-G गेम प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच लॉन्च करण्यापूर्वीपासूनच तरुणाईमध्ये गेमच्या चर्चा आहेत. या गेमचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये पंजाबीमध्ये डॉयलॉग्स ऐकायला मिळतात.
लॉन्च होण्यापूर्वीच 40 लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन
FAU-G ला बॅन करण्यात आलेला मोबाईल गेम, PUBG Mobile चा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. खास गोष्ट म्हणजे, या गेमसाठी लॉन्च होण्यापूर्वीच 40 लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. FAU-G चे डेव्हलपर्स nCore ने यासंदर्भातील माहिती शेअर केली. दरम्यान, या गेमचं प्री-रजिस्ट्रेशन गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरिस सुरु करण्यात आलं होतं.
कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार
अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."
असा करा गेम डाऊनलोड
फौ-जी गेम लॉन्च झाल्यानंतर युजर्ससाठी हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्याचसोबत हा गेम ऑफिशिअल साईटवरुनही डाऊनलोड करता येईल. सध्या फौ-जी गेमची ऑफिशिअल वेबसाइट लॉन्च झालेली नाही. तसेच गेमबाबत सर्व माहिती गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स मार्फत देण्यात येत आहे.
कसं कराल फौ-जी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन?
गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आहे. प्रमोटर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे. प्री-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया गूगल प्ले-स्टोअरवर करण्यात येत आहे.
FAU-G गेम 26 जानेवारी रोजी डाऊनलोड करण्यात येणार आहे. अॅन्ड्रॉईड युजर्स हा गेम प्ले स्टोअरवरुन सहज डाऊनलोड करु शकणार आहेत. तसेच अॅपल युजर्ससाठी हा गेम कधी उपलब्ध होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फौ-जी गेममधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या गेममध्ये एक भाग भारत-चीन लगतच्या गलवान खोऱ्याचा आहे. युजर्स भारताच्या सीमांवर तैनात होऊन शत्रुला सडेतोड उत्तर देऊ शकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :