YouTube Income Impact | भारतीय यूट्यूबर्ससाठी महत्वाची बातमी.. गूगलच्या अमेरिकी करकपातीमुळे तुमच्या कमाईला लागणार कात्री
यूट्यूब चॅनेलला अमेरिकी प्रेक्षकांचा प्रतिसाद नगण्य असला तरी तुम्हाला करविषयक कागदपत्रे सादर करावीच लागणार आहेत. तुम्ही कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत तर तुम्हाला 24 टक्के करकपातीचा फटका बसणार आहे.
मुंबई : यूट्यूबवर व्हिडीओ बनवून पैसे कमवणाऱ्यांसाठी गूगलने अमेरिकी कायद्यानुसार कर कपात करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय अमेरिकेबाहेरच्या जगभरातील सर्व यूट्यूबरसाठी लागू असणार आहे. यामुळे गूगल अॅडसेन्सद्वारे दरमहा होणाऱ्या तुमच्या कमाईला आता थोडी कात्री लागणार आहे. यूट्यूब हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गूगलच्या मालकीचा आहे. त्यांनी प्रत्येक यूट्यूबरच्या कमाईवर परिणाम होईल असा निर्णय जाहीर केला आहे.
यूट्यूब व्हिडीओमधून जी कमाई होते त्यावर आता अमेरिकी कर लागणार आहे. हा कर थोडा थोडका नसून तब्बल 24 टक्के असणार आहे. जून 2021 पासून या करकपातीची अंमलबजावणी होईल. ही करकपात कमीत कमी व्हावी यासाठी गूगलने सर्व यूट्यूबरला दिल्या आहेत. त्यानुसार आपली करविषयक कागदपत्रे यूट्यूबकडे दाखल करायची आहेत. ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी 31 मे 2021 पर्यंतची मुदत आहे. जे यूट्यूबर्स ही कागदपत्रे दाखल करणार नाहीत, त्यांना सरसकट 24 टक्के करकपातीचा सामना करावा लागणार आहे. अर्थातच ही करकपात तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओंना अमेरिकेतील जे प्रेक्षक पाहतात त्यातून होणाऱ्या कमाईवरच द्यायचा आहे. म्हणूनच जे अमेरिकी यूट्यूबर आहेत, त्यांना या करकपातीचा सामना करावा लागणार नाही.
तुमच्या भारतीय किंवा अन्य देशातील यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओंना अमेरिकेतून मिळणारा प्रतिसाद आणि त्या व्हिडीओवरील अमेरिकी प्रेक्षकांनी पाहिलेल्या जाहिरातींमधून जी आर्थिक प्राप्ती होणार आहे, त्यावर 24 टक्के कर आकारणी होणार आहे. ही करकपात केल्यावरच उर्वरीत पैसे तुमच्या अॅडसेन्स अकाऊंटमध्ये जमा होतील. गूगलने प्रत्येक यूट्यूबरला या करकपातीविषयी आवश्यक माहिती देणारा मेल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे दाखल करायची आहेत, याचीही माहिती देण्यात आलीय. भारत किंवा अमेरिकेबाहेरील जे यूट्यूबवर या मेलकडे दुर्लक्ष करतील त्यांना 24 टक्के उत्पन्नावर पाणी सोडावं लागणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात करविषयक सामंजस्य करार झालेला आहे. त्यामुळे जे भारतीय यूट्यूबर्स गूगलने सांगितलेल्यानुसार आवश्यक कागदपत्रे गूगलकडे जमा करतील त्यांना फक्त 15 टक्के करकपात सोसावी लागेल. तसंच जे यूट्यूबर कागदपत्रे सादर करतील आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील कर सामंजस्य करारासाठी पात्र नसतील त्यांना मात्र 30 टक्के करकपात सोसावी लागणार आहे.
तुमच्या यूट्यूब चॅनेलला अमेरिकी प्रेक्षकांचा प्रतिसाद नगण्य असला तरी तुम्हाला करविषयक कागदपत्रे सादर करावीच लागणार आहेत. तुम्ही कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत तर तुम्हाला 24 टक्के करकपातीचा फटका बसणार आहे. तर तुम्ही यूट्यूबकडे सादर केलेल्या कागदपत्रानुसार तुम्ही कर सामंजस्य करारासाठी पात्र असाल तर मात्र फक्त अमेरिकी प्रेक्षकांद्वारे झालेल्या कमाईतून 15 टक्के कर कापला जाणार आहे. उदा. यूट्यूबकडून तुम्हाला दरमहा 1000 डॉलर्सची कमाई होत असेल आणि त्यातील 100 डॉलर्स अमेरिकी प्रेक्षकांकडून होत असेल तर तुम्हाला फक्त 100 डॉलर्सच्या 15 टक्के म्हणजे 15 डॉलर्सचा कर द्यावा लागेल.. पण जर तुम्ही कागदपत्रे दिली नाहीत किंवा तुम्ही आवश्यक कागदपत्रे देऊनही सामंजस्य करारानुसार पात्र नसाल तर मात्र एकूण कमाईच्या सरसकट 24 टक्के करकपात होणार आहे. म्हणजे एकूण 1000 डॉलर्सच्या 24 टक्के म्हणजे 240 डॉलर्सवर तुम्हाला अमेरिकी करांपायी पाणी सोडावं लागेल.