एक्स्प्लोर
ATM कार्डच्या डिटेल्ससाठी तुम्हालाही फोन येतात?

मुंबई: एकीकडे ऑनलाईन व्यवहार वाढत असताना, दुसरीकडे ऑनलाईन चोरांचं प्रमाणही वाढलं आहे. मोबाईल कॉल करुन डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती विचारुन, चोरट्यांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी याबाबत सहा गुन्हे दाखल केले आहेत. या सहाही पीडितांना मोबाईलवर कॉल आला होता. त्यावेळी त्यांना बँक अधिकारी असल्याचं सांगून, त्यांच्याकडून डेबिट/क्रेडिट कार्डचे डिटेल्स विचारले होते. मात्र बँक खात्यातून 1 लाख सहा हजाराची रक्कम गायब झाल्यानंतर संबंधितांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. बँक मॅनेजर असल्याची बतावणी पीडित सहापैकी एका केसमध्ये, आरोपीने डिटेल्स वापरुन पेटीएमवरुन 19,990 रुपयांचा व्यवहार केला. तर तीन केसमध्ये आरोपीने फोन करुन राजेश शर्मा किंवा राकेश शर्मा या नावे फोन करुन, स्टेट बँकेचा मॅनेजर असल्याचं सांगून, क्रेडिट/डेबिट कार्डचे डिटेल्स विचारले. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत डेबिट/क्रेडिट कार्ड फ्रॉड संबंधित 15 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तर डिसेंबर महिन्यात 12 तक्रारी नोंदल्या, मात्र अद्याप कोणीही ताब्यात नाही. पोलिसांच्या मते, "नागरिकांनी काळजी घेणं, प्रतिबंध करणं हाच याबाबतचा सर्वोत्तम उपाय आहे. अशा गुन्ह्यात आरोपींना पकडणं मोठं आव्हान आहे. आरोपींच्या मोबाईल ट्रेस केल्यानंतर एखाद्या राज्यातील कोणत्यातरी वाडी वस्तीत नंबर ट्रेस होतो. त्यामुळे असा तपास खूपच वेळ खाणारा असतो". चोरटे मोबाईलवर काय सांगतात? ऑनलाईन चोरटे कोणतेही मोबाईल नंबर डायल करतात. त्यात तुमचाही नंबर असू शकतो. एखाद्या बँकेचा मॅनेजर किंवा बँकेतून बोलत असल्याचं सांगून, तुमच्या बँक डिटेल्सबद्दल विचारणा करतात. तुम्ही बँक किंवा एटीएम/डेबिट/क्रेडिट कार्डचे डिटेल्स द्या, अन्यथा तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात येईल, असं सांगितलं जातं. एटीएम ब्लॉक झालं तर काय, या विचाराने आपण डिटेल्स देतो आणि इथेच आपली फसवणूक होते. काहीवेळा बँकेचा सर्व्हे सुरु असून, ग्राहकांबद्दलची माहिती जमा करत असल्याचंही सांगितलं जातं. मात्र कोणत्याही बँका मोबाईलवरुन कोणताही सर्व्हे, ग्राहकांची माहिती घेत नाहीत. काय काळजी घ्यावी?
- कोणतीही बँक मोबाईल किंवा फोनवरुन ग्राहकाची माहिती विचारत नाही. त्यामुळे अशा फोन कॉल्सना प्रतिसाद देऊ नका.
- मोबाईलवरुन डेबिट/क्रेडिट किंवा बँक खात्याची डिटेल्स कोणालाही सांगू नका.
- जर तुम्हाला असा फोन कॉल आलाच, तर त्याची माहिती पोलिसांना, सायबर सेलला द्या. तसंच त्याबाबतची माहिती तुमच्या बँकेलाही कळवा.
- मोबाईलवरुन वन टाईम पासवर्डबाबत कोणी विचारत असेल, तर तो अजिबात सांगू नका.
- तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डचा पासवर्ड कोणालाही सांगू नका.
- ठराविक वेळेने तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डचा पासवर्ड/पिन बदलत राहा.
- पासवर्ड ठेवताना अल्फान्यूमरिक म्हणजे पासवर्डमध्ये अंक, अक्षर आणि स्पेशल कॅरेक्टरचा समावेश असावा. जसे की, Abcd@123 वगैर. (पण पासवर्ड ठेवताना सलग अक्षर, किंवा अंक ठेवू नका.)
आणखी वाचा























